युवकांनी कायद्याचे भान ठेवून अमली पदार्थ व रॅगिंगपासून दूर राहावे – न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे

- Advertisement -


सोलापूर, दि. 22 (जिमाका.) :  युवकांमध्ये कायदेविषयक जागरूकता निर्माण करण्याबरोबरच बालकांचे संरक्षण, अमली पदार्थांच्या दुष्परिणामांपासून बचाव आणि रॅगिंगसारख्या गंभीर सामाजिक व कायदेशीर समस्यांविषयी संवेदनशीलता निर्माण करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी कायद्याची माहिती आत्मसात करून जबाबदार नागरिक म्हणून समाजात सकारात्मक भूमिका बजावावी, असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूरचे सचिव तथा न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे यांनी केले.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर यांच्या वतीने गांधी नाथा रंगजी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, सोलापूर येथे पॉक्सो कायदा, अमली पदार्थ प्रतिबंध आणि रॅगिंगसंदर्भातील कायदे याबाबत विधी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते मार्गदर्शन करत होते.

पॉक्सो कायद्याविषयी मार्गदर्शन
कार्यक्रमात सोलापूर बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड. परमानंद जवळकोटे यांनी पॉक्सो कायद्याविषयी मार्गदर्शन केले. बालकांचे लैंगिक शोषण रोखण्यासाठी कायद्यातील तरतुदी, बालकांच्या संरक्षणाची जबाबदारी तसेच कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले.

अमली पदार्थांचे दुष्परिणाम
अमली पदार्थ प्रतिबंध या विषयावर सारथी यूथ फाउंडेशनचे सचिव रामचंद्र वाघमारे यांनी मार्गदर्शन केले. अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे शारीरिक, मानसिक व सामाजिक दुष्परिणाम स्पष्ट करून युवकांनी व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

रॅगिंग ही गंभीर कायदेशीर समस्या
रॅगिंग : सामाजिक व कायदेशीर समस्या या विषयावर न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे यांनी मार्गदर्शन केले. रॅगिंग ही केवळ शिस्तभंगापुरती मर्यादित बाब नसून त्याचे गंभीर कायदेशीर परिणाम आयुष्यावर होऊ शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कायद्याचे पालन करून परस्परांचा सन्मान राखावा, असे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमास सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. संतोष पाटील, गांधी नाथा रंगजी दिगंबर जैन जनमंगल प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय गांधी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे रमेश रोडगी यांची प्रमुख उपस्थिती होती.
00000



Source link

- Advertisement -