राज्याच्या सर्वांगीण औद्योगिक विकासासाठी शासन कटिबद्ध- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – महासंवाद

राज्याच्या सर्वांगीण औद्योगिक विकासासाठी शासन कटिबद्ध- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – महासंवाद
- Advertisement -

मुंबई,  दि 16: राज्याच्या सर्वांगीण औद्योगिक विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. त्यासाठी ‘महाराष्ट्र आर्थिक सल्लागार समिती’ गठित करण्यात आली आहे. या समितीने विविध शिफारशी केल्या असून त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शीघ्र कृती समिती आणि ‘पीएम मित्रा’ च्या माध्यमातून कार्यवाही करण्यात येईल. तसेच या ठिकाणी येणाऱ्या उद्योजकांना सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

अमरावती येथील ‘पीएम मित्रा’ मेगा टेक्सटाईल पार्कचा मुंबईच्या कलिना परिसरातील हॉटेल ग्रॅण्ड हयात येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.

यावेळी केंद्रीय वाणिज्य आणि वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय वस्त्रोद्योग आणि रेल्वे राज्यमंत्री श्रीमती दर्शना जरदोश, उच्च व तंत्र शिक्षण व वस्त्रोद्योग मंत्री  चंद्रकांत पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार नवनीत राणा कौर, अनिल बोंडे, आमदार रवी राणा, राजन सिंग, राहुल कुल, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपिन शर्मा यांच्यासह उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, आजचा दिवस हा महाराष्ट्र सरकारसाठी विशेष दिवस आहे. कोविड कालावधीनंतर राज्यात आज घडीला मोठ्या प्रमाणात विविध प्रकल्पांचे काम प्रगतीपथावर आहे. मेट्रो, आरे कारशेड, बुलेट ट्रेन, शिवडी-न्हावाशेवा एमटीएचएल पूल, कोस्टल रोड यासारखी विविध कामे प्रगतीपथावर आहेत. राज्यात मोठ्या प्रमाणात कुशल मनुष्यबळ, जमीन, पाणी, ऊर्जा, दळणवळणाच्या सुविधा निर्माण होत आहेत. राज्याला पुढे नेण्यासाठी जे काही प्रयत्न करावे लागतील ते सर्व करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. राज्यात गुंतवणूक करणाऱ्या उद्योजकांना  विभागाच्या वतीने  चांगल्या  सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. देशाचे पाच ट्रिलियन डॉलर इकोनॉमीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून त्यापैकी महाराष्ट्र एक ट्रिलियन डॉलर उद्दिष्ट साध्य करण्याचे काम करेल, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले. ‘पीएम मित्रा’ च्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होणार आहे. विशेषतः महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

डाओसमध्ये अनेक देशाच्या प्रतिनिधींना महाराष्ट्रातील गुंतवणीसाठी गुतवणूक संधिची माहिती दिली असून अनेक उद्योगांनी राज्यात गुंतवणुकीसाठी उत्सकता दाखवली आहे. यावेळी 1 लाख 37 हजार कोटी रुपयांचे करार झाले असून यापैकी 86 हजार कोटींचे कामे सुरू आहेत.

राज्यामध्ये 75 हजार सरकारी नोकर भरतीचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. समृद्धी महामार्गामुळे अनेक सुविधा निर्माण होत आहेत. या कनेक्टिव्हिटीमुळे इंधन व वेळेची बचत होणार आहे. त्याचबरोबर मुंबईत देखील बदल घडत असताना दिसत आहेत खड्डे मुक्त मुंबई, मुंबईच्या सौंदर्यकीकरणावर भर व  स्वच्छतेला प्राधान्य देण्यात आले आहे.

               पीएम मित्रामुळे विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठी संधी- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रातील अमरावतीसह देशात सात ठिकाणी ‘पीएम मित्रा’ अंतर्गत (मेगो इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन अॅण्ड अॅपेरल) मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल पार्क अमरावतीजवळ नांदगाव पेठ येथे हा पार्क उभारला जाणार असून त्यामुळे  विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. राज्यात टेक्स्टाईल पॉलिसी आल्यामुळे कापूस उत्पादक जिल्ह्यात सूतगिरण्या उभारल्या पाहिजे. अमरावती इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट सिस्टीममध्ये इकोसिस्टीमची घोषणा झाल्यावर अनेक उद्योजक या ठिकाणी गुंतवणूक करण्यास तयार झाले आहेत.

यासाठी एक हजार एकर जमीनीचे अधिग्रहण करण्यात आले असून यामध्ये जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, कापड उद्योगासाठी एकात्मिक प्रक्रिया, आधुनिक औद्योगिक पायाभूत सुविधा या सर्व सुविधा पार्क मध्ये असणार आहेत. ‘पीएम मित्रा’ पार्क मुळे जागतिक दर्जाच्या औद्योगिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यात मदत करतील. ज्यामुळे थेट परदेशी गुंतवणुकीसह (FDI) मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित होईल आणि या क्षेत्रातील नाविन्य आणि रोजगार निर्मितीला प्रोत्साहन मिळेल.

पीएम-मित्रा केंद्रे पंतप्रधानांच्या 5 एफ संकल्पनेपासून प्रेरित आहे. ही 5 एफ संकल्पना म्हणजे शेतकरी ते धागे बनविणे ते फॅक्टरी ते फॅशन ते परदेश निर्यात अशी पाच सूत्रे होय. वर्धा ट्रान्सपोर्ट तयार होत आहे. रस्ते, रेल्वे आणि विमान वाहतुक या सर्व सुविधा अमरावतीच्या टेक्स्टाईल पार्कच्या जवळ मिळतील. आज याबाबत चार सामंजस्य करार करण्यात आले आहे. ही सुरवात असून एक हजार एकर जमीनीपेक्षा अधिक जमीन अधिग्रहित करावी लागणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्रात उद्योगस्नेही इकोसिस्टीमचे काम जलद गतीने- केंद्रीय मंत्री पियुष गोयल

केंद्रीय वाणिज्य आणि वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल म्हणाले की, महाराष्ट्र प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. महाराष्ट्रातील इकोसिस्टीमचे काम गतीने होत आहे. जलद गतीने पायाभूत सुविधा वाढत आहेत. कोस्टल रोडचे काम चालू आहे. ट्रान्स हार्बर लिंक अंतिम टप्प्यात आहे. मुंबई ते पुणे हे अंतर दोन तासामध्ये पार पडेल यासाठीची योजना अंतिम टप्प्यात आहे. मेट्रो, समृद्धी महामार्ग तसेच इतर दळणवळणाच्या सुविधा राज्यात उपलब्ध होत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती येथे ‘पीएम मित्रा’ पार्कसाठी पत्रव्यवहार करून त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला याचा त्यांनी यावेळी आवर्जून उल्लेख केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारताच्या उभारणीची संकल्पना प्रत्यक्षात आणण्याच्या दृष्टीकोनातून तसेच जागतिक वस्त्रोद्योगास चालना देण्यासाठी या ‘पीएम मित्रा’ पार्क च्या उभारणीला मंजुरी दिली आहे. 3.5 ट्रिलियन डॉलर वरून 35 ट्रिलियन डॉलर इकॉनोमी वाढवण्यासाठी भारत विकासाच्या दृष्टीने पावले टाकत आहे. देशातील युवा-युतीना  सोबत घेऊन चांगल्या गुणवत्तेसोबत देशाचे नाव उज्ज्वल  करावे असे आवाहन  केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यांनी यावेळी केले.

केंद्र आणि महाराष्ट्राच्या एकत्रित प्रयत्नातून चांगले परिणाम दिसतील- केंद्रीय राज्यमंत्री दर्शना जरदोश

केंद्रीय राज्य वस्त्रोद्योग राज्यमंत्री श्रीमती दर्शना जरदोश म्हणाल्या की, महाराष्ट्र हडलूम, हँडीक्राफ्ट उद्योगास प्रोत्साहन देण्यात येत आहे. सोलापुरी चादरी, पैठणी, पुणेरी साडी, अश्या अनेक हडलूम प्रसिद्ध आहेत. केंद्र आणि महाराष्ट्र राज्य सोबत चालल्यास चांगले परिणाम दिसतील असेही  त्या यावेळी म्हणाल्या.

‘पीएम मित्रा’ पार्कच्या माध्यमातून एक लाख रोजगार निर्मिती- उद्योग मंत्री उदय सामंत

उद्योग मंत्री श्री सामंत म्हणाले की, ‘पीएम मित्रा’ पार्क च्या माध्यमातून एक लाख रोजगार मिळणार आहे. यासाठी उद्योग विभागाच्या वतीने उद्योजकासाठी जे जे लागेल ते देण्यासाठी उद्योग विभाग सहकार्य करेल. हे सरकार आल्यानंतर दहा महिन्यात 1 लाख 10 हजार कोटींची गुंतवणूक राज्यात आली. यापुढे  महाराष्ट्र राज्याला पहिल्या क्रमांकावर नेण्यासाठी  उद्योग विभाग प्रयत्नशील असेल असा विश्वास उद्योग मंत्री श्री.सामंत यांनी यावेळी व्यक्त केला. या ‘पीएम मित्रा’ पार्कमुळे 12 महिन्यात 6 हजार कोटींची गुंतवणूक राज्यात येणार असून 15 हजार कोटी  उद्योजकाच्या खात्यावर जमा होणार आहेत.

याठिकाणी जागतिक स्तरावरील पायाभूत सुविधा दिल्या जातील. प्रकल्पासाठी लागणारी जमीन अधिग्रहणाच्या मोबदल्यात त्यांना एका महिन्याच्या आत संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात 183 कोटी जमा करण्यात आले. राज्यात चांगले कौशल्य विकास केंद्र तयार करण्यात येणार असून यामाध्यमातून चांगले प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करण्यात येणार आहे. यावेळी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये चार सामंजस्य करार करण्यात आले.

- Advertisement -