मुंबई, दि. ४ : श्रीवर्धन व परिसरातील रोठा सुपारीला (जीआय टॅग) भौगोलिक मानांकन देण्याबाबत तसेच राज्यातील मागणीआधारित पिकांना भौगोलिक मानाकंन देण्यासाठी निधीची तरतूद करण्याबाबत विभागाने कार्यवाही करावी, असे निर्देश कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. श्रीवर्धन व परिसरातील रोठा सुपारीला भौगोलिक मानांकन देण्याबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत कृषीमंत्री दत्तात्रय भरणे बोलत होते. या बैठकीला महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, डॉ.बाळासाहेब सांवत कृषी विद्यात्रीठाचे कुलगुरू डॉ.संजय भावे उपस्थित होते.
कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, राज्यातील मागणी आधारित पिकांना भौगोलिक मानाकंन देण्यासाठी कृषी विभागाने गतीने कार्यवाही करावी. यासाठी नवीन लेखाशिर्ष तयार करावे. ज्या भागातील पीक आहे त्या भागातील शेतकऱ्यांना या मानांकनामुळे लाभ मिळणे शक्य होईल, असेही ते म्हणाले. मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, ‘श्रीवर्धनी’ सुपारी कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आढळते. विशेषतः रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर, श्रीवर्धन, दिवेआगर, मुरुड-जंजिरा, शेवटांडा आणि अलिबाग या भागांत सुमारे १०१.४८ हेक्टर क्षेत्रावर या सुपारीची लागवड करण्यात येते. या सुपारीची इतर जातींच्या तुलनेत वाढ जोमदार असून उत्पादनही अधिक मिळते. रायगड हा या सुपारीचा मूळ प्रदेश असल्याने तिच्या वैशिष्ट्यांचे संरक्षण आणि शेतकऱ्यांना अधिक आर्थिक लाभ मिळावा यासाठी जीआय टॅग मिळविण्याची प्रक्रिया राबविणे आवश्यक आहे. श्रीवर्धन ‘रोटा’ सुपारीला भौगोलिक मानांकन मिळवून देण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी, असेही त्या म्हणाल्या.
0000
संध्या गरवारे/विसंअ





















WhatsApp