राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये स्काऊट-गाईड बंधनकारक – मंत्री दादाजी भुसे – महासंवाद

    - Advertisement -

    • १ लाख ८ हजार शाळांतील २ कोटी १० लाख विद्यार्थ्यांना मिळणार प्रशिक्षण

     मुंबई, दि. १४ : राज्यातील सर्व माध्यमांच्या १ लाख ८ हजार शाळांमधील सुमारे २ कोटी १० लाख विद्यार्थ्यांना स्काऊट-गाईडचे प्रशिक्षण बंधनकारक करण्याचे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले.

    शालेय शिक्षण मंत्री भुसे यांनी सर्व शाळांमध्ये स्काऊट-गाईडचा विस्तार करण्याबाबत बैठक घेतली. राज्यातील ३० हजार शाळांमधील सुमारे १७ लाख ३३ हजार विद्यार्थ्यांना सध्या स्काऊट-गाईडचे प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणाची व्याप्ती राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांपर्यंत वाढविण्याचे निर्देश त्यांनी दिले.

    ‘राष्ट्र प्रथम’ ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवून शालेय शिक्षण विभाग काम करीत आहे. त्यामुळे सर्व शाळांमध्ये स्काऊट-गाईड असणे आवश्यक आहे. या उपक्रमांतर्गत परेड, संचलन आणि देशभक्तिपर गीतांवरील कवायत बंधनकारक करावी. तसेच ‘आनंददायी शनिवार’ उपक्रमांतर्गत आठवड्यातून दोन तासिका यासाठी घेण्यात याव्यात, असे निर्देश मंत्री भुसे यांनी दिले.

    स्काऊट-गाईड उपक्रमासाठी शाळांमधील शिक्षकांना तालुकास्तरावर सात दिवसांचे प्रशिक्षण द्यावे. यासाठी जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांचे शुल्क आणि प्रशिक्षकांचे मानधन शालेय शिक्षण विभागामार्फत देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. राज्य पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांना सध्या तीन, तर राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांना दहा गुण दिले जातात. या गुणांमध्ये वाढ करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश मंत्री भुसे यांनी अधिकाऱ्यांना दिले.

    यावेळी प्रधान सचिव रणजीत सिंह देओल, शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह (ऑनलाईन), एससीईआरटी चे संचालक मंगेश जोशी (ऑनलाईन), उपसचिव तुषार महाजन, स्काऊट-गाईडचे सहायक राज्य सचिव रमेश जाधव यांच्यासह शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

    ०००००

    बी.सी.झंवर/विसंअ

     

     

     

     

    - Advertisement -