विशेष संक्षिप्त पुनरीक्षणचे कामकाज वेळेत पूर्ण करा; वैध मतदान पद्धतीबाबत मतदार जनजागृती करा – विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले – महासंवाद

    - Advertisement -

    सांगली, दि. १४ (जि. मा. का.) : विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेंतर्गत सांगली जिल्ह्यातील ९५.८० टक्के मतदार हे अंतिम यादीमध्ये वर्ग करण्याची कार्यवाही पूर्ण झाली असून, उर्वरित कामास गती देऊन प्रलंबित कामकाज पूर्ण करावे. संपूर्ण प्रक्रिया निर्धारित वेळेत आणि पारदर्शकपणे पूर्ण करावी. तसेच महाराष्ट्र विधानपरिषद पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत मतदार यादीत नाव शोधणे व योग्य रीतीने मतदान कसे करावे याबाबत अधिकाधिक जनजागृती करावी, असे निर्देश विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक तथा निवडणूक निर्णय अधिकारी शीतल तेली-उगले यांनी आज येथे दिले.

    सांगली जिल्ह्यातील विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेंतर्गत कामकाज तसेच महाराष्ट्र विधानपरिषद पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी तथा सहाय्यक जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. मैनाक घोष, अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी नीता शिंदे, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेसाठी नियुक्त अधिकारी उपस्थित होते.

    भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या विशेष सघन पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत दावे व हरकती दाखल करण्याच्या कालावधीत २६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. यापूर्वी ही मुदत १२ ऑक्टोबरपर्यंत निश्चित करण्यात आली होती. सुधारित कार्यक्रमानुसार दावे व हरकती दाखल करण्याची प्रक्रिया २६ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार असून, प्राप्त दावे व हरकती निकाली काढण्याची प्रक्रिया १० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. अंतिम मतदार यादी १६ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. या प्रक्रियेतील कामकाजादरम्यान येणाऱ्या अडचणींचे निराकरण करून निर्धारित वेळापत्रकापूर्वी आणि अचूकतेने पूर्ण करण्याच्या दृष्टीने त्यांनी संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना दिल्या.

    विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले म्हणाल्या, मतदार यादीच्या शुद्धीकरणाच्या दृष्टीने एसआयआर प्रक्रिया महत्त्वाची असून, या प्रक्रियेत संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने काम करणे आवश्यक आहे. विशेष संक्षिप्त पुनरीक्षणाचे काम प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम करावे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व पर्यवेक्षकांच्या माध्यमातून क्षेत्रीय स्तरावरील कामकाजावर नियमित देखरेख ठेवावी. तसेच मतदार नोंदींची पडताळणी, मॅपिंग आणि अर्जांचा निपटारा यामध्ये अचूकता राखून निर्धारित वेळेत काम पूर्ण करावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

    बैठकीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO), पर्यवेक्षक तसेच बूथ लेव्हल एजंट (BLA) यांच्या नियुक्त्या आणि पुनरीक्षण प्रक्रियेतील विविध कामांच्या प्रगतीचा आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.

    पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत मतदार जनजागृती करा

    या बैठकीत सांगली जिल्ह्यातील मिरज, सांगली, इस्लामपूर, शिराळा, पलूस-कडेगाव, खानापूर, तासगाव-कवठे महांकाळ आणि जत या आठ विधानसभा मतदारसंघांतील निवडणूकपूर्व तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

    यावेळी पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत मतदार यादीत नाव कसे शोधायचे तसेच, वैध मतदानाची योग्य पद्धत याविषयी सर्व माध्यमांतून मतदार जनजागृती करावी, असे त्यांनी यावेळी सूचित केले.

    00000

    - Advertisement -