मुंबई, दि. २२: महाराष्ट्र राज्यात अवैध दारूची निर्मिती, विक्री आणि बेकायदेशीर वाहतुकीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने कडक पावले उचलली असून, विभागाने गेल्या काही वर्षांत व्यापक आणि प्रभावी कारवायांचा धडाका सुरू ठेवला आहे. उपलब्ध मनुष्यबळ आणि संसाधनांचा योग्य वापर करत सराईत गुन्हेगारांवर बारकाईने लक्ष ठेवून प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत. या कठोर मोहिमांमुळे एका बाजूला बेकायदेशीर दारू धंद्यांना चाप बसला आहे, तर दुसऱ्या बाजूला शासनाच्या महसूलात मोठी वाढ नोंदवली गेली आहे.
२०२२-२३ ते २०२६-२७ मध्ये ३० जून २०२६ पर्यंत या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने नोंदवलेल्या एकंदरीत कामगिरीचा आढावा घेतला असता, विभागाने कारवाईत लाखो रुपयांचा मुद्देमाल आणि वाहने जप्त केली आहेत.
अवैध दारू व्यवसायावर व्यापक प्रहार
महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत राज्यभरात करण्यात आलेल्या कारवायांमध्ये विभागाने गेल्या काही वर्षांत सातत्य राखले आहे. सन २०२२-२३ मध्ये विभागाने ५१,८१२ एकूण गुन्हे नोंदवून ४०,३७८ वारस गुन्हे दाखल केले होते. या कारवाईत ४३,६८३ आरोपींना अटक करण्यात आली होती. २०२३-२४ मध्ये गुन्ह्यांची संख्या ५५,९८१ वर पोहोचली, ज्यात ४६,९५७ वारस गुन्हे नोंदवून ५०,४९८ आरोपींना जेरबंद करण्यात आले आणि ३,५५७ वाहनांसह १७,३९१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
कारवाईचा हा धडाका २०२४-२५ आणि २०२५-२६ या वर्षांतही कायम राहिला. २०२४-२५ मध्ये ६६,७३६ गुन्ह्यांची नोंद करत ६०,७९१ आरोपींना अटक करण्यात आली ४,२५८ वाहनांसह १९,८०४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला. तर २०२५-२६ या आर्थिक वर्षात ७५,२३२ एकूण गुन्हे नोंदवून सर्वाधिक ६७,५०४ आरोपींना अटक करण्यात आली. या वर्षात ४,७४८ वाहने आणि २५,४६० लाख रुपयांचा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
चालू आर्थिक वर्षात, म्हणजेच १ एप्रिल २०२६ ते ३० जून २०२६ या अवघ्या तीन महिन्यांच्या कालावधीतही विभागाने आपल्या धडक कारवायांचे सत्र सुरूच ठेवले आहे. या अल्प कालावधीत एकूण १९,८०४ गुन्हे नोंदवून १७,७४३ वारस गुन्हे दाखल करण्यात आले असून १८,४९२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच ८३४ वाहने जप्त करत ७,६२१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
हातभट्टी दारू आणि इतर गुन्ह्यांवर विशेष लक्ष
अवैध हातभट्टी दारूमुळे होणारे धोके विचारात घेता विभागाने या प्रकारच्या गुन्ह्यांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. २०२२-२३ मध्ये हातभट्टी निर्मिती आणि विक्रीबाबत २५,०८९ गुन्हे नोंदवून १४,०३७ आरोपींना अटक करण्यात आली होती. २०२५-२६ पर्यंत हा आकडा ३१,०२१ गुन्ह्यांपर्यंत आणि २३,५२१ अटकेपर्यंत पोहोचला. चालू वर्षात जून २०२६ पर्यंत अवघ्या तीन महिन्यांत ९,१६३ हातभट्टी गुन्हे नोंदवून ६,९७१ आरोपींवर कारवाई करण्यात आली असून २,५५३ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
याशिवाय, परराज्यातून होणाऱ्या बेकायदेशीर मद्य वाहतुकीवरही विभागाने करडी नजर ठेवली आहे. १ एप्रिल २०२६ ते ३० जून २०२६ दरम्यान परराज्यातील मद्याशी संबंधित ४६६ गुन्हे नोंदवून ४३२ आरोपींना अटक करण्यात आली आणि ३,८५१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याच कालावधीत ताडीशी संबंधित ८३९ गुन्हे, अवैध धाबा व हॉटेल्सवरील कारवायांचे २,६३६ गुन्हे आणि इतर ६,७०० गुन्ह्यांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे.
मोठ्या प्रमाणावर दारू साठा आणि रसायने जप्त
विभाग दरवर्षी लाखो लिटर देशी दारू, गावठी दारू, बिअर, आयएमएफएल तसेच दारू निर्मितीसाठी लागणारे रसायन व स्पिरीट जप्त करत आहे. २०२५-२६ या वर्षात सर्वाधिक म्हणजे १,२०,६४,४४२ लिटर गावठी दारू आणि १,७०,२२,९८३ लिटर रसायन जप्त करण्यात आले होते. चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीतच १,५४,५४२ लिटर देशी दारू, ३,७१,७९१ लिटर गावठी दारू, ७,९१७ लिटर बिअर, २,७१,८१८ लिटर परराज्यातील दारू आणि ४४,६८,३४६ लिटर रसायन जप्त करण्यात यश आले आहे.
शासकीय महसूलात वाढ
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या या निरंतर आणि प्रभावी कारवाईचा थेट सकारात्मक परिणाम राज्याच्या महसूल संकलनावर दिसून येत आहे. २०२३-२४ मध्ये विभागाने २३,३२३.२७ कोटी रुपयांचा महसूल जमा केला होता. २०२४-२५ मध्ये हा महसूल वाढून २५,४६७.९६ कोटी रुपयांवर पोहोचला. तर २०२५-२६ मध्ये या महसूलाने २९,९५७.९५ कोटी रुपयांचा टप्पा गाठला. चालू वर्षात (१ एप्रिल २०२६ ते ३० जून २०२६ पर्यंत) अवघ्या तीन महिन्यांत विभागाने ६,९६२.६९ कोटी रुपयांचा भरीव महसूल जमा केला आहे.
अशा प्रकारे, सराईत गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधात्मक कारवाई आणि बेकायदेशीर दारू धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी विभागाने आखलेल्या रणनीतीमुळे गुन्हेगारीला मोठा आळा बसत असून शासनाच्या तिजोरीत दरवर्षी घसघशीत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.
0000
निलेश तायडे/विसंअ





















WhatsApp