राष्ट्रीय आरोग्य अभियानातील पदभरती समित्यांची पुनर्रचना – महासंवाद

    - Advertisement -

    मुंबई, दि. ७ : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्य शासन दरवर्षी प्रकल्प अंमलबजावणी आराखडा मंजूर करते. या आराखड्यात विविध आरोग्य कार्यक्रमांतील पदांना मंजुरी दिली जाते. यापूर्वी जिल्हास्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील एकाच समितीमार्फत पदभरती केली जात होती. जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अधिनस्त पदांच्या भरतीसाठी परस्पर अधिकारी सदस्य सचिव असल्याने स्थानिक स्तरावर अडचणी निर्माण होत असल्यामुळे या समित्यांची पुनर्रचना करण्यात आली असून नुकतेच शासनाने यासाठी परिपत्रक जारी केले आहे.

    जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अधिनस्त पदांच्या भरती समितीचे अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी, तर सदस्य सचिव जिल्हा आरोग्य अधिकारी असतील. माता व बाल संगोपन अधिकारी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक आणि संबंधित कार्यक्रमाचे प्रतिनिधी किंवा विषयतज्ज्ञ हे सदस्य असतील. जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या अधिनस्त पदांच्या समितीचे अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सदस्य सचिव जिल्हा शल्य चिकित्सक असतील. निवासी वैद्यकीय अधिकारी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक आणि संबंधित कार्यक्रमाचे प्रतिनिधी किंवा विषयतज्ज्ञ यांचा सदस्य म्हणून समावेश असेल.

    महानगरपालिकास्तरीय समितीचे अध्यक्ष महानगरपालिका आयुक्त आणि सदस्य सचिव वैद्यकीय आरोग्य अधिकारी असतील. माता व बाल संगोपन अधिकारी, शहर कार्यक्रम व्यवस्थापक तसेच संबंधित कार्यक्रमाचे प्रतिनिधी किंवा विषयतज्ज्ञ हे सदस्य असतील. नगरपालिकास्तरीय समितीत मुख्य कार्यकारी अधिकारी अध्यक्ष, तालुका आरोग्य अधिकारी सदस्य सचिव, तर जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा प्रशासकीय अधिकारी (नगरपालिका), मुख्याधिकारी आणि जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक हे सदस्य असतील.

    परिमंडळस्तरीय समितीचे अध्यक्ष उपसंचालक, परिमंडळ आणि सदस्य सचिव परिमंडळ कार्यक्रम व्यवस्थापक असतील. आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य किंवा राज्य आरोग्य व कुटुंब कल्याण संस्था, नागपूरचे प्राचार्य, सहायक संचालक तसेच संबंधित कार्यक्रमाचे प्रतिनिधी किंवा विषयतज्ज्ञ यांचा समितीत समावेश करण्यात आला आहे.

    जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी स्तरावरील सामायिक पदांची भरती करताना मुख्य कार्यकारी अधिकारी संबंधित स्तरावर सदस्य सचिवांची नियुक्ती करतील.

    ००००

    मनिषा सावळे/विसंअ

     

     

    - Advertisement -