ऑक्सिजनची पातळी कमी म्हणजे ९५च्या खाली येत असलेल्या रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी, तसेच कोणत्याही प्रकारचा धोका नको म्हणून रुग्णालयामध्ये दाखल केले जाते. या औषधाचा वापर करण्याच्या टप्प्यात असलेल्या रुग्णांसाठी पुरेशा इंजेक्शनची उपलब्धता होत नाही. एखाद्या रुग्णालयात या औषधाची गरज असलेले आणि निकषांमध्ये बसत असणारे १०० रुग्ण असतील, तर इंजेक्शनची उपलब्धता अद्याप एकूण मागणीच्या दहा टक्के इतकीच केली जाते. उपलब्धता नाही म्हणून रुग्णांच्या कुटुंबीयांना इंजेक्शनची उपलब्धता तपासण्यासाठी सांगितले, तर त्यावेळी कारवाई करण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. जी रुग्णालये ‘नॉन कोविड’आहेत तिथे इंजेक्शनची उपलब्धता ठेवण्यात आलेली नाही.त्यामुळे या ठिकाणी लक्षणे असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांचे काय करायचे, असा प्रश्नही वैद्यकीय तज्ज्ञांनी उपस्थित केला आहे.
राज्य सरकारने दिलेल्या आणि ‘आयसीएमआर’च्या सर्व निकषांमध्ये साधर्म्य नसल्यामुळेही रुग्णालयांचा गोंधळ होतो, याकडे ‘एएमसी’चे माजी अध्यक्ष डॉ. दीपक बैद यांनी लक्ष वेधले. हा तिढा सोडवायचा असेल, तर निकषांनुसार गरज असलेल्या रुग्णांना औषधांची उपलब्धता योग्य प्रमाणात व्हायला हवी. कोणतेही डॉक्टर या औषधाचा गैरवापर करणार नाहीत, असाही मतप्रवाह डॉक्टरांमधून उपस्थित होत आहे.
नियम पाळण्यात असमानता
या इंजेक्शनची उपलब्धता हवी असेल, तर औषधांच्या चिठ्ठीसह त्या रुग्णाचा रिपोर्ट द्यावा लागतो. त्यात त्या रुग्णाच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी, त्याला करोना संसर्गाची लागण झाल्याचा अहवाल, इतर लक्षणांची इत्यंभूत माहिती त्यात असावी लागते. मुंबईसह राज्यात काही ठिकाणी हा अहवाल दिला जातो, तर काही ठिकाणी केवळ औषधांच्या चिठ्ठीवरही रेमडेसिवीरची उपलब्धता केली जाते. याकडे आयसीयूतज्ज्ञ डॉ. एम. एस. माणिक यांनी लक्ष वेधले. या औषधांच्या उपलब्धतेसाठी असलेले नियम सगळीकडे समान असायला हवेत, असाही आग्रह त्यांनी व्यक्त केला.
या औषधांचा आग्रह नको
अनेकदा रुग्णाचे नातेवाईकही रेमडेसिवीर द्या, असा आग्रह धरतात, हा मुद्दाही डॉक्टरांनी लक्षात आणून दिला. ज्यांना औषधांचे कोणतेही ज्ञान नाही, तेसुद्धा डॉक्टरांसोबत हुज्जत घालत असल्याचा कटू अनुभवही अनेक डॉक्टरांनी सांगितला.