
सातारा दि. १७ : महाराष्ट्र सरकारच्या कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाच्या वतीने राज्यातील युवकांचे राहणीमान उंचावण्यासाठी आणि त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. युवकांना कौशल्य विकास, रोजगार आणि स्वयंरोजगाराचे मार्गदर्शन करण्यासोबतच उद्योजकांच्या मागणीनुसार अल्पकालावधीचे मोफत प्रशिक्षण देऊन कुशल मनुष्यबळ निर्माण करणे आणि नावीन्यपूर्ण नवसंकल्पनांना प्रोत्साहन देणे हे या विभागाचे मुख्य उद्दिष्ट आहे, असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयातील धनाजी बागल यांनी सांगितले.
शासनाच्या विविध योजना गणेशोत्सव कालावधीत थेट नागरिकांसाठी पोहचाव्यात यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्या फलटण येथील शिव छत्रपती गणेत्सव मंडळ, श्रीमंत गणशोत्सव मंडळ,फलटण राजमाता अहिल्यादेवी होळकर गणेशोत्सव मंडळ या ठिकाणी लोकसंवाद-2026 कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास जिल्हा माहिती अधिकारी हेमंत चव्हाण यांच्यासह मंडळाचे अध्यक्ष, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ई-प्रशासनाच्या माध्यमातून उमेदवारांना पारदर्शक आणि विकेंद्रितपणे सेवा पुरवण्यावर विभागाचा भर आहे, असे सांगून श्री. बागल म्हणाले, याअंतर्गत युवकांना रोजगारक्षम बनवणे, उद्योजकांशी समन्वय साधून त्यांच्या आवश्यकतेनुसार कुशल उमेदवार पुरवणे, आधुनिक प्रशिक्षण पद्धतीद्वारे कौशल्य तफावत दूर करणे आणि युवकांचा सामाजिक-आर्थिक स्तर उंचावण्यासाठी त्यांना आवश्यक सहाय्य पुरवले जात आहे.
नोकरी इच्छुक उमेदवार आणि उद्योजक या दोघांसाठीही विभागाच्या वेबपोर्टलवर विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. उमेदवारांना निशुल्क ऑनलाइन नावनोंदणी करून खाजगी क्षेत्रातील रिक्त पदांसाठी थेट अर्ज करता येतो.याशिवाय जिल्ह्यातील उद्योग क्षेत्रातील मागणी लक्षात घेऊन १५ ते ४५ वयोगटातील उमेदवारांसाठी ३ ते ६ महिने कालावधीचे अल्पमुदतीचे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित मोफत प्रशिक्षण दिले जात आहे. यामध्ये केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान’ आणि प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र’ यांसारख्या विविध महत्त्वाकांक्षी योजनांचा समावेश असून, याद्वारे युवकांना स्वावलंबी आणि रोजगारक्षम बनवण्याचे मोठे काम केले जात आहे.
२९ सप्टेंबर २०२६ रोजी राज्यभर एकाच दिवशी रोजगार मेळावे व प्लेसमेंट ड्राइव्ह आयोजित करण्यात येणार आहेत. मुधोजी महाविद्यालय फलटण या ठिकाणीही रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्याचा फलटण तालुक्यातील बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा, असेही आवाहन श्री. बागल यांनी केले.
0000

WhatsApp