वन्यप्राण्यांमुळे होणारे पिकांचे नुकसान

- Advertisement -

भरपाईच्या रकमेत वाढ करण्यासाठी प्रयत्न

– डॉ. अनिल बोंडे

मुंबई : वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानभरपाईमध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी आज येथे सांगितले.

          सिंधुदूर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्यांच्या अनुषंगाने डॉ. बोंडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस राज्याचे गृहराज्यमंत्री तसेच सिंधुदूर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासह कृषी विभाग, वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते.

          सिंधूदुर्ग जिल्ह्यामध्ये माकडांमुळे नारळाच्या फळांचे मोठे नुकसान होते. तसेच दक्षिणेकडील काही भागात हत्तींचा उपद्रव होतो. याशिवाय गवा तसेच अन्य वन्यप्राणीदेखील पिकांच्या नुकसानीला कारणीभूत ठरतात. सध्याची नुकसानभरपाईची रक्कम कमी आहे, असे बैठकीत सांगण्यात आले. यावर डॉ. बोंडे यांनी निर्देश दिले की, नुकसानभरपाईचे निकष सुधारीत करुन भरपाईच्या रकमेत  दुपटीने वाढ करण्याची शिफारस वनविभागाकडे करण्यात यावी. तसेच वन्य प्राण्यांपासून पिकांच्या संरक्षणासाठी उपाययोजना तयार करणे आवश्यक आहे. त्यासाठी कृषी विद्यापीठाने प्रयोग करुन उपाययोजना सुचविण्याबाबत निर्देश द्यावेत. ते प्रयोग यशस्वी ठरल्यास पीक संरक्षणाच्यादृष्टीने योजना तयार करता येईल.

- Advertisement -