वाशिम ‘एमआयडीसी’साठी 44.85 कोटी मंजूर – मंत्री डॉ.उदय सामंत

- Advertisement -


मुंबई, दि. १८ : वाशिम जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी वाशिम एमआयडीसीतील मुख्य व अंतर्गत रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी १८ कोटी रुपये, पाणीपुरवठा योजनेसाठी १६ कोटी रुपये आणि पायाभूत सुविधांसाठी १०.८५ कोटी रुपये मंजूर करण्यात येतील, अशी माहिती उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिली. तसेच वाशिम येथील एमआयडीसीतील वारंवार होणाऱ्या वीज खंडित होण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी ३ कोटी ८२ लाख रुपयांचा निधी जिल्हा नियोजन निधीतून देण्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मान्य केले.

 

मंत्री डॉ. सामंत आणि वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कृषी मंत्री भरणे यांच्या उपस्थितीत मंत्रालय येथे वाशिम जिल्ह्यातील औद्योगिक विकासाबाबत बैठक झाली. बैठकीस राज्यमंत्री इंद्रनील नाईक, आमदार भावना गवळी, आमदार श्याम खोडे, खासदार संजय देशमुख, वाशिम जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, एमआयडीसीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार तसेच वाशिम जिल्ह्यातील उद्योजक उपस्थित होते.

वाशिम विकास केंद्रातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण खराब झाले असून, त्यासाठी १८ कोटी रुपयांचा प्रस्ताव प्रलंबित असल्याचे मंत्री डॉ. सामंत यांनी सांगितले. त्यास तत्काळ मान्यता दिली. तसेच आकांक्षित जिल्हा म्हणून वाशिमला प्राधान्य देत हा निधी मंजूर करण्याची कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश डॉ. सामंत यांनी दिले.

एमआयडीसीतील सध्याचा पाणीपुरवठा विहिरीवर अवलंबून असून, उन्हाळ्यात विहीर आटल्यामुळे उद्योगांना पाण्याची अडचण निर्माण होते. त्यामुळे पंचाळा धरणातून पाणी आणण्यासाठी १६ कोटी रुपयांच्या या योजनेला उद्योगमंत्र्यांनी मान्यता देत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

एमआयडीसीमध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने वाशिम येथे ३३ केव्ही वीजवाहिनी उभारण्यासाठी ३ कोटी ८२ लाख रुपयांचा प्रस्ताव आहे. उद्योगांसाठी वीजपुरवठा सुरळीत होणे अत्यावश्यक असल्याचे नमूद करत हा निधी डीपीडीसीतून देण्याची जबाबदारी पालकमंत्री श्री. भरणे यांनी स्वीकारली.

एमआयडीसीतील भूखंडांचे जलदगतीने वाटप करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश डॉ. सामंत यांनी दिले. वाशिम एमआयडीसीमध्ये कायमस्वरूपी प्रशासकीय यंत्रणा उपलब्ध करून देणे तसेच उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रादेशिक अधिकारी (आरओ) यांनी आठवड्यातील एक दिवस वाशिममध्ये उपलब्ध राहावे, असे निर्देश डॉ. सामंत यांनी दिले.

इसापूर धरणातून वाशिमसाठी प्रस्तावित पाणीपुरवठा योजनेत एमआयडीसीसाठी स्वतंत्र पाणी आरक्षणाचा विचार करावा, असे सांगून मंत्री डॉ. सामंत यांनी जलसंपदा विभागाच्या पाणी वाटप समितीकडे एमआयडीसीसाठी पाणी आरक्षणाचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. एमआयडीसीच्या पाणीपुरवठ्यासाठी स्वतंत्र व्यवस्था व स्वतंत्र पाइपलाइन आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

000

संजय ओरके/विसंअ



Source link

- Advertisement -