मुंबई, दि. १९ : विद्यार्थ्यांनी आपल्या वेळेचा सदुपयोग विधायक कामांसाठी करत सामाजिक जाणीव जोपासावी. समाजाच्या गरजा आणि स्वतःची आवड, क्षमता ओळखून सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग नोंदवावा. असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.
मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि वैयक्तिक अडचणी जाणून घेतल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीमुळे होणारे फायदे, तसेच त्यांना येणाऱ्या अडचणी याबाबत सविस्तर चर्चा केली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना सकारात्मक प्रतिसाद देत त्यांच्या सूचनांवरही चर्चा करण्यात आली.
मंत्री पाटील म्हणाले, विद्यार्थीदशा ही व्यक्तिमत्त्व विकासाचा महत्त्वाचा टप्पा असतो. या काळात समाजासाठी काम करण्याची वृत्ती महत्त्वाची असते. विद्यार्थ्यांनी वेळेचा सदुपयोग करून ज्ञान, कौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकासाबरोबरच सामाजिक कार्यात सहभागी व्हावे. मुलींना उच्च शिक्षण घेताना आर्थिक मदत आणि आत्मविश्वासपूर्ण करण्याच्या दृष्टीने त्यांना दरमहा दोन हजार रुपये पॉकेट मनी उपलब्ध करून देण्याबाबत विद्यापीठ, महाविद्यालये आणि शिक्षण विभागाचे संयुक्त प्रयत्न सुरू असल्याचेही मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी सांगितले.
इतिहासाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या इतिहासाचा केवळ अभ्यास न करता तो जपण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. ऐतिहासिक वारसा, वास्तू आणि सांस्कृतिक ठेवा यांच्या संवर्धनासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकता यावे यासाठी इंटर्नशिपच्या संधी अधिक व्यापक करण्यावरही भर दिला जात आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांना मार्गदर्शन आणि संवादाची गरज असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपले प्रश्न मोकळेपणाने मांडावेत आणि महाविद्यालयांनीही विद्यार्थ्यांशी नियमित संवाद ठेवावा, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी विद्यापीठ आणि महाविद्यालयांना केले.
यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, खालसा महाविद्यालयाचे प्राचार्य, रुईया महाविद्यालय, सिद्धार्थ महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या अडचणी, अपेक्षा आणि भविष्यातील वाटचालीबाबत जाणून घेत दोन तास विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
0000
काशीबाई थोरात/ विसंअ









WhatsApp