साहित्यिक आदान-प्रदानासाठी अनुवाद कार्यशाळेचे गुरुवारी मुंबईत आयोजन

- Advertisement -


मुंबई, दि. १९ : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत कार्यरत विविध भाषांच्या साहित्य अकादमींच्या माध्यमातून साहित्यिक आदान-प्रदानाला प्रोत्साहन देण्यासाठी गुरुवार, २० ऑगस्ट २०२६ रोजी अनुवाद कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही कार्यशाळा सकाळी १० वाजता प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी परिसरातील लघु नाट्यगृह, तिसरा मजला येथे होणार आहे. सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत हिंदी, सिंधी, गुजराती, संस्कृत, तेलुगु, बंगाली आणि गोर बंजारा या भाषांसाठी साहित्य अकादमी कार्यरत आहेत. संबंधित भाषांचे जतन व संवर्धन करण्यासोबतच विविध उपक्रमांचे आयोजन आणि राज्यभाषा मराठी तसेच संबंधित भाषांमध्ये साहित्यिक आदान-प्रदानाला चालना देणे हा या अकादमींचा प्रमुख उद्देश आहे.

मराठीतील उत्कृष्ट साहित्यकृतींचा विविध भाषांमध्ये तसेच विविध भाषांतील उत्कृष्ट साहित्यकृतींचा मराठीत अनुवाद करण्यास प्रोत्साहन देणे, हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश आहे. प्रख्यात लेखिका, अनुवादिका व भाषा प्रशिक्षक मंजिरी धामणकर अनुवादाच्या मूलभूत बाबींविषयी मार्गदर्शन करणार आहेत. तसेच भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभागांतर्गत कार्यरत नॅशनल लँग्वेज ट्रान्सलेशन मिशनने विकसित केलेल्या ‘भाषिणी’ या प्लॅटफॉर्मच्या विविध सुविधांचा वापर करण्याबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यामध्ये भाषादान, अनुवाद, लेखानुवाद, चित्रानुवाद आदी उपयोजनांचा समावेश आहे.

या कार्यशाळेस राज्यातील विविध भागांतून विविध भाषांतील तज्ज्ञ अनुवादक, भाषा अभ्यासक, प्राध्यापक तसेच अनुवाद क्षेत्रात रस असलेले महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी होणार आहेत. साहित्यिक देवाण घेवाण अधिक व्यापक करण्यासह विविध भारतीय भाषांमधील साहित्य मराठी वाचकांपर्यंत आणि मराठी साहित्य इतर भाषांतील वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ही कार्यशाळा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

सांस्कृतिक कार्य विभागाचे मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून ही कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे. यात जास्तीत जास्त अनुवादकांनी तसेच अभ्यासकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन अकादमीद्वारे करण्यात येत आहे.

0000

संजय ओरके /विसंअ

 



Source link

- Advertisement -