विधानपरिषद प्रश्नोत्तरे – महासंवाद

विधानपरिषद प्रश्नोत्तरे – महासंवाद
- Advertisement -

माणिकगड सिमेंट कंपनीवर प्रदूषण प्रकरणी कारवाई; ६५ लाखाची बँक गॅरंटी जप्त – पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे

मुंबई, दि.25:-  चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर येथील माणिकगड सिमेंट कंपनी प्रदूषण नियंत्रण संयंत्राचा वापर करत नसल्याबाबत प्रदूषणाच्या प्राप्त तक्रारींवरून संबंधित उद्योगाविरोधात त्या-त्या वेळी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईतून आतापर्यंत सुमारे 65 लाखाची बँक गॅरंटी जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेत दिली.

सदस्य सुधाकर अडबाले यांनी याविषयी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य अभिजित वंजारी यांनी सहभाग घेतला.

पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले, कंटीन्युअस एअर क्वालिटी मॉनिटरिंग सिस्टीम (सीएएमएएस) आणि ऑनलाईन कंटीन्युअस एमिशन मॉनिटरिंग सिस्टीम च्या माध्यमातून उद्योगाचे प्रदूषण विहित मर्यादेत असल्याचे तपासले जात आहे.

डंपिंगसारखे विषय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अखत्यारीत येत असल्याने त्यास पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या परवानगीची आवश्यकता नसल्याचे सांगत पर्यावरण मंत्री मुंडे म्हणाल्या, विधिमंडळ सदस्यांनी यासंदर्भात केलेल्या तक्रारी संदर्भात पुन्हा एकदा तातडीने अधिकारी पाठवून त्याची पडताळणी केली जाईल.

आरोग्याच्या समस्या सोडविण्याकरिता आरोग्य विभागामार्फत कॅम्प आयोजित केले जात असल्याचे सांगून संबधित उद्योगाला घनकचरा साठवणूक बंद करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जे उद्योग प्रदूषण संदर्भातील नियमांचे उल्लंघन करतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही पर्यावरण मंत्री मुंडे यांनी दिला.

0000

एकनाथ पोवार/विसंअ

कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर – पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे

मुंबई, दि.25 : कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.  तसेच फ्लाय अॅशसंदर्भात धोरण अस्तित्वात असून शहरातील डेब्रिजवर प्रक्रिया करून तयार होणारी अॅश बांधकामात पुनर्वापर होऊ शकते, अशी माहिती पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेत  प्रश्नोत्तराच्या तासावेळी दिली.

विधान परिषद सदस्य डॉ. मनिषा कायंदे यांनी राज्यातील हवेच्या प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य शशिकांत शिंदे, ज्ञानेश्वर म्हात्रे, अमित गोरखे यांनी सहभाग घेतला.

पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी या प्रश्नाच्या उत्तरात अधिक माहिती देताना सांगितले, राज्यात हवेच्या गुणवत्तेचे परीक्षण करण्यासाठी केंद्राची यंत्रणा कार्यरत आहे. यामधून तेथील परिसराचे मॉनिटरिंग केले जाते. ‘समीर’ अ‍ॅपच्या माध्यमातून दररोजची हवेची गुणवत्ता नागरिकांना पाहता येते.

मुंबईसह अन्य मोठ्या शहरात सुरू असलेल्या  बांधकामामुळे धूळ व ध्वनी प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर  या ठिकाणची पाहणी करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ पाहणीसाठी पाठविण्यात येईल. तसेच सदस्यांकडून विशिष्ट स्वरूपाची तक्रार मिळाल्यास त्यावरही तत्काळ कारवाई केली जाईल, असेही पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी या प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

वायू प्रदूषण नियंत्रण व प्रदूषणकारी घटकांचा अटकाव करण्यासाठी मुंबई वायू शमन प्रभावी योजना 2023 ची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्यात बांधकामावरील नियंत्रणासाठी 28 मुद्द्यांची सर्वंकष मार्गदर्शक तत्वे निर्गमित करण्यात आली आहेत. या नियमांची काटेकोर पालन न करणारी बांधकामे बंद करण्याचे आदेश दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

0000

एकनाथ पोवार/विसंअ

खोपोलीतील मंगेश काळोखे यांच्या हत्येप्रकरणी दोषींवर कारवाई करण्यात येणार – गृह राज्यमंत्री योगेश कदम

मुंबई, दि.25 : रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे घडलेल्या मंगेश काळोखे यांच्या हत्येप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

याबाबत सदस्य भाई जगताप यांनी प्रश्न उपस्थित केला.

गृह राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले, या प्रकरणाचा तपास सुरू असून, गुन्ह्यात थेट किंवा अप्रत्यक्ष सहभाग असलेल्या सर्वांची सखोल चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणात आतापर्यंत एकूण 17 आरोपींना अटक करण्यात आली असून एका विधि संघर्षीत बालकाला ताब्यात घेऊन बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे. सुपारी देणे, सुपारी घेणे किंवा संघटित गुन्हेगारीचा संबंध असल्यास त्याचाही सखोल तपास केला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

0000

शैलजा पाटील/विसंअ

- Advertisement -