मुंबई, दि. २७ : राज्यातील विविध जिल्ह्यांत सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळाच्या अधिवेशनाला पुढील आठवड्यात सोमवार (दि. ३१ जुलै) आणि (दि. १ ऑगस्ट २०२३) रोजी सुट्टी राहिल. त्यानंतर दि. २, ३ व ४ ऑगस्ट २०२३ रोजी विधिमंडळाचे कामकाज नियमितपणे होईल. विधानभवन येथे, विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाज सल्लागार समितीच्या आज झालेल्या बैठकींमध्ये हा निर्णय घेण्यात आला.
विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, वने, सांस्कृतिक कार्य मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार, उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास व पंचायत राज, पर्यटन मंत्री गिरीष महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादाजी भुसे, आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार बाळसाहेब थोरात, जयंत पाटील, आमदार अमिन पटेल यांच्या उपस्थितीत विधानसभेच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली.
विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. पवार, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, संसदीय कामकाज मंत्री श्री. पाटील, आमदार सर्वश्री एकनाथराव खडसे, ॲड. अनिल परब, भाई जगताप, जयंत पाटील, सतेज पाटील, विलास पोतनीस, प्रसाद लाड, कपिल पाटील, भाई गिरकर, प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. दोन्ही बैठकींना संसदीय कार्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या दोन्ही बैठकींमध्ये सदर निर्णय घेण्यात आला
००००