
मुंबई, दि. १७ : वाहनाची नोंदणी होण्यापूर्वीच ग्राहकाला वाहनाचा ताबा दिल्याप्रकरणी वांद्रे येथील मे. नवनीत मोटर्स या वाहन वितरकाचे व्यवसाय प्रमाणपत्र 30 दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहे. यासंदर्भातील आदेश परिवहन आयुक्तांनी जारी केले आहेत.
परिवहन विभागाच्या चौकशीत मे. नवनीत मोटर्स यांनी 13 ऑक्टोबर 2026 रोजी एमएच 01 एफएम 2211 क्रमांकाचे वाहन नोंदणी होण्यापूर्वीच वाहन मालकाच्या ताब्यात दिल्याचे निदर्शनास आले. या वाहनाचा मोटार वाहन कर 12 ऑक्टोबर रोजी भरण्यात आला होता, तर वाहनाची अधिकृत नोंदणी 16 ऑक्टोबर रोजी करण्यात आली. नियमानुसार वाहनाची नोंदणी झाल्यानंतर त्यावर उच्च सुरक्षा नोंदणी पाटी (एचएसआरपी) बसविणे बंधनकारक आहे. मात्र, नोंदणीपूर्वीच वाहनाचा ताबा दिल्याचे चौकशीत स्पष्ट झाले.
या प्रकरणी 6 नोव्हेंबर 2026 रोजी संबंधित वाहन वितरकाची सुनावणी घेण्यात आली. त्यानंतर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी परिवहन आयुक्तांनी संबंधित वितरकाचे व्यवसाय प्रमाणपत्र 30 दिवसांसाठी निलंबित करण्याचे आदेश दिले. महाराष्ट्रात वास्तव्य करणारे काही वाहनधारक राज्याचा मोटार वाहन कर बुडविण्याच्या उद्देशाने इतर राज्यांत वाहनांची नोंदणी करीत असल्याचे परिवहन विभागाच्या निदर्शनास आले आहे. अशा वाहनांची तपासणी करण्यासाठी विभागामार्फत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
परराज्यात नोंदणी केलेली वाहने वारंवार महाराष्ट्राच्या रस्त्यांवर वापरताना आढळल्यास संबंधित वाहनांवर जप्तीची कारवाई करण्यात येईल, असा इशारा परिवहन विभागाने दिला आहे. त्यामुळे संबंधित वाहनधारकांनी नियमानुसार आपल्या वाहनांची महाराष्ट्र राज्यात नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन सह परिवहन आयुक्त (आयटी) शैलेश कामत यांनी केले आहे.
000
संजय ओरके/विसंअ

WhatsApp