
मुंबई, दि. १७ : राज्य शासनाच्या वतीने प्रदान करण्यात येणाऱ्या विविध सांस्कृतिक व कलाक्षेत्रातील मानाच्या पुरस्कारांच्या निवडीसंदर्भात सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या मंत्रालयातील दालनात बैठक पार पडली. या बैठकीत विविध पुरस्कारांसाठी गठित तज्ज्ञ समित्यांच्या सदस्यांशी पुरस्कारांच्या अनुषंगाने प्राथमिक चर्चा करण्यात आली.
विविध पुरस्कारांचा आढावा
तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार, भारतरत्न पं. भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार, ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार, नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार आणि संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार हे २०२५-२६ आणि २०२६-२७ या वर्षांसाठी देण्याबाबत चर्चा झाली. तसेच गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार आणि स्वरसम्राज्ञी आशा भोसले पुरस्कार २०२६-२७ या वर्षासाठी देण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.
महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या २०२५-२६ आणि २०२६-२७ या वर्षांच्या पुरस्कार निवडीसंदर्भातही प्राथमिक चर्चा करण्यात आली. या विविध पुरस्कारांसाठी प्रत्येकी १० लाख रुपये रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह, तर महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी २५ लाख रुपये रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
बैठकीस सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर, कार्यक्रम अधिकारी निलेश धुमाळ आणि मिलिंद बिर्जे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी तसेच विविध पुरस्कारांसाठी गठित तज्ज्ञ समित्यांचे सदस्य उपस्थित होते.
00000

WhatsApp