शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या आवश्यक अटी शिथिल करणार – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे – महासंवाद

    - Advertisement -

    मुंबई, दि. १७ : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात कृषीविषयक योजना राबविताना शेतकरी उत्पादक कंपन्या आणि संघटनांना येणाऱ्या अडचणींचा विचार करून शेतकरी हितासाठी या कंपन्यांच्या आवश्यक अटी शिथिल करण्यासंदर्भातील प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

    कृषिमंत्री भरणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोनची आढावा बैठक झाली. या बैठकीत शेतकरी उत्पादक कंपन्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेताना येणाऱ्या अडचणी, पात्रतेचे निकष, अनुदान प्रक्रिया आणि कृषी व्यवसाय घटकांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. यावेळी आमदार देवराव भोंगळे, सचिव परिमल सिंह, स्मार्ट प्रकल्पाचे प्रकल्प संचालक प्रदीप चंद्रन,नानाजी कृषी संजीवनी प्रकल्पाच्या प्रकल्प संचालक मीनल करणवाल यांच्यासह विभागातील अधिकारी उपस्थित होते.

    प्रकल्पांतर्गत कृषी मूल्यसाखळी बळकटीकरण, कृषी व्यवसाय विकास केंद्र आणि वैयक्तिक कृषी उद्योजकता या घटकांवर भर देण्यात आला आहे. शेतकरी उत्पादक कंपन्यांना गोदामे, शीतगृहे, कांदा चाळ, बीज प्रक्रिया केंद्रे, अन्नधान्य प्रक्रिया उद्योग, कृषी अवजारे, पशुखाद्य निर्मिती आणि जैविक निविष्ठा निर्मितीसारखे व्यवसाय उभारण्यासाठी प्रोत्साहन दिले जात असल्याचे कृषिमंत्री भरणे यांनी सांगितले.

    शेडनेट व पॉलीहाऊससाठी अनुदान, शेती सिंचनासाठी इलेक्ट्रॉनिक बिलाची अट, शेळीपालनासाठी खरेदी प्रक्रिया, कृषी अवजारे बँक योजनेत शेतकरी उत्पादक कंपन्या व संघटनांचा समावेश तसेच गोदाम बांधकामासाठी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाशी संबंधित अटी तपासून आवश्यक सुधारणा कराव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले.

    शेतकरी उत्पादक संघटनांना केवळ आर्थिक सहाय्य देण्यापुरते मर्यादित न ठेवता त्यांना सक्षम कृषी उद्योजक म्हणून विकसित करण्याची आवश्यकता आहे. योजनांच्या अंमलबजावणीतील अनावश्यक अडथळे दूर करून शेतकऱ्यांना अधिक सुलभतेने लाभ मिळवून देण्यासाठी संबंधित विभागांनी सकारात्मक भूमिका घ्यावी. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे, शेतीमालाचे मूल्यवर्धन करणे आणि ग्रामीण भागातील कृषी आधारित उद्योगांना चालना देण्यासाठी प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश कृषिमंत्री भरणे यांनी दिले.

    ०००००

    संध्या  गरवारे/विसंअ

     

     

    - Advertisement -