सिंधुदुर्गनगरी, दि. ४: कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी आज कुडाळ तालुक्यातील रानबांबुळी येथील ग्राम महसूल अधिकारी कार्यालयाला भेट देत महसूल कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी येथील अंगणवाडीला भेट देऊन बालकांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या शिक्षण, पोषण आणि सुविधांची माहिती जाणून घेतली.

ग्राम महसूल अधिकारी कार्यालयातील भेटीदरम्यान विभागीय आयुक्त अग्रवाल यांनी प्रलंबित फेरफार नोंदी, वारस नोंदी तसेच इतर महसुली प्रकरणांच्या निपटाऱ्याचा आढावा घेतला. नागरिकांच्या अर्जांवर तातडीने कार्यवाही करून प्रकरणे विनाविलंब निकाली काढण्याच्या दृष्टीने आवश्यक सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. महसूल सेवा अधिक गतिमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यावर त्यांनी भर दिला.

यानंतर विभागीय आयुक्तांनी रानबांबुळी येथील अंगणवाडीला भेट देत बालकांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक, पोषण व आरोग्यविषयक सुविधांची माहिती घेतली. अंगणवाडीतील चिमुकल्यांशी त्यांनी अत्यंत आपुलकीने संवाद साधला. तसेच अंगणवाडीतील वातावरण, शैक्षणिक साहित्य, पोषण आहार आणि बालविकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचीही त्यांनी पाहणी केली.

या प्रसंगी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुशे, तहसीलदार सचिन पाटील, जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया वालावलकर, कुडाळचे गटविकास अधिकारी मनोज भोगटे, मुख्य सेविका राखी राणे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
००००





















WhatsApp