
धुळे, दि.२३ : शिंदखेडा तालुक्यातील ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी रस्ते, सिंचन, पिण्याचे पाणी, शेती आणि रोजगारनिर्मितीच्या कामांना प्राधान्य देण्यात येत आहे. विशेषतः शेतकऱ्यांना आपला शेतीमाल शेतातून थेट मुख्य रस्त्यापर्यंत आणि बाजारपेठेत सहज पोहोचवता यावा, यासाठी ग्रामीण व पाणंद रस्त्यांचे जाळे मजबूत करण्यात येत आहे. मंजूर विकासकामे दर्जेदार आणि निर्धारित वेळेत पूर्ण करण्यावर भर असल्याचे राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.
शिंदखेडा तालुक्यातील नेवाडे येथे रस्त्याच्या कामाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, जिजाबराव पाटील, मुकेश गिरासे, ध्वनंजय पिंगळे, प्रभाकर पाटील, विश्वनाथ पाटील, आर. आर. पाटील, आत्माराम पाटील, पी. एल. पाटील, अशोक पवार, सरपंच लक्ष्मीकांत पाटील, माजी सरपंच भाऊ पाटील, नगरसेवक सुयोग भदाणे, चेतन परमार, सुभाष जगताप, पप्पू मराठे, शैलेश पवार, अमृत पाटील, किशोर बाबूलाल पवार, उपअभियंता अजयकुमार पवार, उपअभियंता तेजस गोसावी, कनिष्ठ अभियंता शुभम राजपूत, मोहनसिंग गिरासे, कौतिकलाल साळुंखे, विकास पवार, राहुल पाटील, नरेश बागूल, सुरेश सोनवणे, विकास जाधव, भगवान पवार, किशोर तेजस पवार, सुरेश पाटील, भरत जाधव, अमर गिरासे, नितीन गिरासे यांच्यासह विविध गावांचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. रावल म्हणाले की, शिंदखेडा तालुक्यात गेल्या दोन दशकांत रस्ते, पूल आणि दळणवळणाच्या सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली आहे. तापी नदीकाठावरील गावांना जोडणाऱ्या रस्त्यांमुळे नागरिकांचा प्रवास सुलभ झाला असून, शेतीमालाच्या वाहतुकीलाही चालना मिळाली आहे. नेवाडे परिसरातील रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर शेतकरी, विद्यार्थी आणि ग्रामस्थांना त्याचा थेट लाभ होणार आहे.
नेवाडे ते वरपाडे आणि परिसरातील इतर जोडरस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. परिसरातील रस्त्यांच्या कामांसाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ही कामे गुणवत्तापूर्ण पद्धतीने आणि नियोजित कालावधीत पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्री श्री. रावल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. रस्त्यांच्या कामांमध्ये दर्जाशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांच्या दृष्टीने पाणंद रस्ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. सिंचनाच्या सुविधा वाढल्यानंतर शेतीचे उत्पादन वाढणार असून, हा शेतीमाल बाजारपेठेत वेळेत पोहोचण्यासाठी चांगले रस्ते आवश्यक आहेत. त्यासाठी पाणंद रस्त्यांच्या विकासाची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात चार रस्त्यांची कामे करण्यात आली असून, पुढील टप्प्यात आणखी १५ रस्त्यांची कामे सुरू करण्याचे नियोजन असल्याचे पालकमंत्री श्री. रावल यांनी सांगितले.
सिंचन विस्तारातून दुष्काळी भागाला दिलासा
शिंदखेडा तालुक्यातील दुष्काळी भागाला कायमस्वरूपी सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध प्रकल्पांवर काम सुरू आहे. सुलवाडे बॅरेज, उपसा सिंचन योजना आणि इतर जलसिंचन प्रकल्पांच्या माध्यमातून शेतीला पाणी उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. आगामी तीन वर्षांत सुमारे ५० हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळवून देण्याचे उद्दिष्ट असून, पहिल्या टप्प्यात सुमारे ६,५०० हेक्टर क्षेत्राला लाभ मिळण्याची अपेक्षा असल्याचे पालकमंत्री श्री. रावल यांनी सांगितले.
बुराई नदी बारमाही करण्याचे प्रयत्न, घोडगाव उपसा सिंचन प्रकल्प, धरणे आणि विहिरींच्या माध्यमातून शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढविण्यात येत आहे. तालुक्याच्या मध्यवर्ती भागातील पावसावर अवलंबून असलेल्या गावांना शाश्वत सिंचन सुविधा कशा देता येतील, यासाठी विशेष नियोजन सुरू असल्याचे पालकमंत्री श्री. रावल यांनी नमूद केले.
पिण्याचे पाणी आणि रोजगारनिर्मितीवर भर
ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दीर्घकाळासाठी सोडविण्याच्या दृष्टीने ८५ गाव पाणीपुरवठा योजना महत्त्वाची आहे. या योजनेच्या कामांना गती देऊन नागरिकांना नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे पालकमंत्री श्री. रावल यांनी सांगितले.
तालुक्यात औद्योगिक विकासालाही चालना देण्यात येत आहे. नरडाणा औद्योगिक क्षेत्राच्या माध्यमातून उद्योग आणि रोजगाराच्या संधी वाढत आहेत. स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी औद्योगिक गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यात येत असल्याचे पालकमंत्री श्री. रावल यांनी स्पष्ट केले.
शेतमालासाठी आधुनिक बाजारपेठेचे नियोजन
शिंदखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीमालाच्या विक्रीसाठी अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. यासाठी सुमारे १५ ते १७ कोटी रुपयांच्या विशेष निधीतून अतिरिक्त शेड, एक हजार टन क्षमतेचे गोदाम आणि इतर आवश्यक सुविधा विकसित करण्याचे नियोजन असल्याचे पालकमंत्री श्री. रावल यांनी सांगितले.
तालुक्यातील कापूस उत्पादन लक्षात घेता वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी टेक्स्टाईल पार्क उभारण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न सुरू आहेत. शेतीमालावर स्थानिक पातळीवर प्रक्रिया होऊन शेतकऱ्यांना अधिक आर्थिक लाभ आणि युवकांना रोजगार मिळावा, हा त्यामागील उद्देश असल्याचे पालकमंत्री श्री. रावल यांनी नमूद केले.
दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना प्राधान्य
सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना आवश्यक मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनामार्फत उपाययोजना राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पंचनामे करून पात्र लाभार्थ्यांना आर्थिक मदत देण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. ज्या पात्र शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नाही, त्यांच्यापर्यंतही लाभ पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे पालकमंत्री श्री. रावल यांनी सांगितले.
शेतकऱ्यांसाठी मोफत कृषी वीज, नमो शेतकरी महासन्मान निधी आणि शेतकरी कर्जमुक्ती यांसारख्या योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातूनही आर्थिक सहाय्य दिले जात असल्याचे पालकमंत्री श्री. रावल यांनी नमूद केले.
नेवाडे परिसरातील रस्त्यांची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करून नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. संबंधित विभागांनी कामांच्या गुणवत्तेवर नियमित लक्ष ठेवावे. रस्ते, पाणी, सिंचन, शिक्षण आणि रोजगाराच्या सुविधा अधिक बळकट करून शिंदखेडा तालुक्याला प्रगत आणि समृद्ध बनविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही पालकमंत्री श्री. रावल यांनी यावेळी दिली.
रस्ते व पुलांच्या कामांसाठी ४९९.९२ लाखांची तरतूद
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम (उत्तर) विभागामार्फत शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा-वरवाडे परिसरातील विविध रस्ते व पुलांच्या कामांसाठी ४९९.९२ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या कामांत भाग-आमळथे ते वरवाडे (नवाडे गावात) या मार्गावरील १,६५० मीटर लांबीच्या काँक्रीट रस्त्याचे बांधकाम, सुलवाडे ते रामा-12 या मार्गावरील १००० मीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण, तसेच वरवाडे येथे लहान पूल व संरक्षण भिंतीच्या बांधकामाचा समावेश आहे. या कामांमुळे परिसरातील गावांची रस्ते जोडणी अधिक मजबूत होऊन नागरिकांची वाहतूक सुरक्षित व सुलभ होणार आहे. ही कामे पूर्ण करण्यासाठी ९ महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.
००००००

WhatsApp