
अहिल्यानगर, दि. २३ (जिमाका) : शेतकऱ्यांना शेतीसाठी हक्काचे आणि शाश्वत पाणी उपलब्ध करून देणे, पावसाच्या अनिश्चिततेमुळे होणारे पीकनुकसान कमी करणे आणि ग्रामीण भागातील शेती अर्थव्यवस्थेला बळकटी देणे, यासाठी राज्य शासन विविध सिंचन व जलसंधारण प्रकल्पांना प्राधान्य देत आहे. याच प्रयत्नांचा महत्त्वपूर्ण भाग असलेल्या तुकाई उपसा सिंचन योजनेमुळे कर्जत तालुक्यातील १९ गावांमधील सुमारे ५९९ हेक्टर शेतीला सिंचनाची सुविधा उपलब्ध होणार आहे. या योजनेअंतर्गत २७ तलावांमध्ये पाणी उपलब्ध होणार असून, सौरऊर्जेवर आधारित यंत्रणेमुळे शेतकऱ्यांना वीजबिलाचा भारही सहन करावा लागणार नाही. त्यामुळे तुकाई उपसा सिंचन योजना कर्जतच्या दुष्काळी भागासाठी वरदान ठरणार असल्याचे प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी केले.

शेतीला पाणी, शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देणारी योजना
सभापती प्रा. राम शिंदे म्हणाले की, शेतीचे उत्पादन वाढविणे, पीक नुकसानीची जोखीम कमी करणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे या दृष्टीने तुकाई उपसा सिंचन योजना अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मृद व जलसंधारण विभागाची ही पहिली उपसा सिंचन योजना असून, यासाठी ६६ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या योजनेच्या माध्यमातून २७ तलाव भरले जाणार असून, सुमारे ५९९ हेक्टर शेतीला सिंचनाचा लाभ मिळणार आहे.
या योजनेतील पाण्याचे व्यवस्थापन पाणी वापर संस्थेमार्फत करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, योजनेसाठी सौरऊर्जेद्वारे विजेची उपलब्धता करण्यात आली असल्याने वीजबिलाचा अतिरिक्त आर्थिक भार शेतकऱ्यांवर पडणार नाही. पाण्याची उपलब्धता वाढल्यामुळे शेतकऱ्यांना पिकांचे नियोजन करणे शक्य होईल. पारंपरिक शेतीसोबतच फळबाग लागवड आणि अधिक उत्पन्न देणाऱ्या पिकांकडे वळण्याची संधी निर्माण होईल. यामुळे शेती अधिक फायदेशीर होऊन शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीत सकारात्मक बदल घडण्यास मदत होणार आहे.
परिसरातील पाझर तलावांच्या बळकटीकरणासाठीही विशेष प्रयत्न करण्यात येणार असून, त्याबाबतचा प्रस्ताव पंधरा दिवसांत तयार करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. सिंचनाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासोबतच उपलब्ध पाण्याचे संवर्धन आणि योग्य व्यवस्थापन करण्यावरही भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
जलयुक्त शिवार ३.० मधून १८ हजार गावे जलसमृद्ध करणार
मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड म्हणाले की, राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी जलसंधारणाची कामे लोकसहभागातून व्यापक लोकचळवळ म्हणून उभी राहणे आवश्यक आहे. जलयुक्त शिवार 3.0 ही योजना लवकरच कार्यान्वित करण्यात येणार असून, या माध्यमातून राज्यातील १८ हजार गावांमध्ये जलसंधारणाची विविध कामे करून ही गावे जलसमृद्ध करण्याचे उद्दिष्ट आहे. या कामांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
शेतजमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शेती‘ ही योजना महत्त्वपूर्ण ठरत आहे. या योजनेअंतर्गत धरणांमधील गाळ काढण्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जात आहे. त्यामुळे जलसाठ्यांची क्षमता वाढण्यासोबतच गाळाचा वापर शेतीची सुपीकता वाढविण्यासाठी होणार आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेची कामे राज्यातील १ हजार ५२० गावांमध्ये सुरू आहेत. याशिवाय जलतारा प्रकल्प, नाला रुंदीकरण व खोलीकरण, बंधाऱ्यांची दुरुस्ती आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग यांसारख्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून पावसाचे पाणी अडविणे, जिरविणे आणि त्याचा शेतीसाठी उपयोग करणे यावर भर दिला जात आहे.
तुकाई उपसा सिंचन योजना ही केवळ पाणी उपलब्ध करून देणारी योजना नसून कर्जत तालुक्यातील दुष्काळी भागाच्या कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा देणारा महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी सभापती प्रा. राम शिंदे यांचा पाठपुरावा महत्त्वाचा ठरला आहे. सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांना पीकपद्धतीत बदल करता येईल, फळबाग लागवडीला चालना मिळेल आणि शेतीचे उत्पादन व उत्पन्न वाढण्यास मदत होईल. शासनाच्या विविध जलसंधारण आणि सिंचन योजनांचा लाभ शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न असल्याचेही मंत्री राठोड यांनी सांगितले.
मिरजगावच्या भैरवनाथ उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणासाठी निधी मंजूर
कर्जत तालुक्यातील सिंचन सुविधांचा विस्तार करण्याच्या दृष्टीने मिरजगाव येथील भैरवनाथ उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणासाठी ८६ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहितीही मंत्री संजय राठोड यांनी दिली. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनाच्या नव्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने पुढील कार्यवाहीला गती मिळणार आहे.
०००००

WhatsApp