डॉ. नीलम गोऱ्हे यांचा विधिमंडळातील २५ वर्षांचा प्रवास महिला सक्षमीकरण आणि सामाजिक प्रश्नांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण – राज्यपाल जिष्णु देव वर्मा – महासंवाद

    - Advertisement -

    मुंबई, दि. २३ : लोकप्रतिनिधी म्हणून डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधानपरिषदेत केलेले कार्य, सामाजिक प्रश्नांवरील त्यांची भूमिका आणि विविध विषयांवरील अनुभव यांचे दस्तऐवजीकरण करणारा ‘विधानपरिषद कामकाज : माझा सहभाग’ या पुस्तकाचा चौथा खंड समाजासाठी उपयुक्त ठरेल. विधानपरिषदेत २५ वर्षे काम करताना महिला सक्षमीकरण, बालसंरक्षण आणि सामाजिक प्रश्नांना त्यांनी सातत्याने वाचा फोडली आहे. त्यांचा हा प्रवास महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.

    विधानपरिषदेच्या माजी उपसभापती तथा आमदार डॉ. नीलम गोऱ्हे लिखित ‘विधानपरिषद कामकाज : माझा सहभाग’ या पुस्तकाच्या चौथ्या खंडाचे प्रकाशन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते लोकभवन येथील परिषद सभागृहात झाले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, गृह राज्यमंत्री योगेश कदम, आमदार प्रवीण दरेकर, राज्यपालांचे सचिव डॉ.प्रशांत नारनवरे आणि ज्येष्ठ साहित्यिक प्रवीण दवणे उपस्थित होते.

    डॉ. नीलम गोऱ्हे यांचा अनुभव समाजासाठी महत्त्वपूर्ण दस्तऐवज – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

    डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधानपरिषदेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या बाकांवर काम केले असून, उपसभापती म्हणूनही सभागृहाचे कामकाज सांभाळले आहे. त्यामुळे त्यांना सभागृहाच्या कामकाजाचा सर्वांगीण अनुभव आहे. महिलांवरील अत्याचार असोत किंवा बालकांवरील अन्याय, पीडितांच्या मदतीसाठी त्या तत्परतेने पुढे येतात. सार्वजनिक जीवनात लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे ही महत्त्वपूर्ण बाब आहे. त्यांच्या पुस्तकांमधून त्यांच्या अनुभवांचे दस्तऐवजीकरण झाले असून, ते समाजासाठी उपयुक्त ठरेल, असे राज्यपालांनी सांगितले.

    धोरणनिर्मितीमध्ये विधिमंडळाची भूमिका महत्त्वाची असते. समाजावर परिणाम करणारे प्रश्न सभागृहात मांडले जाणे आवश्यक आहे. डॉ. गोऱ्हे यांचा ३६० अंशांचा दृष्टिकोन आणि संसदीय कामकाजाचा अनुभव या पुस्तकाचे महत्त्व अधोरेखित करतो. नव्या पिढीतील लोकप्रतिनिधींसाठीही हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल. या पुस्तकाच्या पाचव्या खंडाचीही प्रतीक्षा राहील, असे सांगून राज्यपालांनी डॉ. गोऱ्हे यांचे अभिनंदन केले.

    सामाजिक प्रश्नांचा जिवंत दस्तऐवज म्हणजे नीलमताईंचे कार्य – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    अन्यायग्रस्त महिलांची मैत्रीण ते शिवसेनेची रणरागिणी, सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्या ते अभ्यासू आणि आक्रमक लोकप्रतिनिधी, अशी डॉ. नीलम गोऱ्हे यांची बहुआयामी ओळख आहे. सामान्य माणसाचे प्रश्न आत्मीयतेने समजून घेऊन त्यांचा अभ्यास करणे, सभागृहात ते ठामपणे मांडणे आणि न्याय मिळेपर्यंत त्यांचा पाठपुरावा करणे ही त्यांच्या कामाची खास शैली आहे. त्यांच्या कार्याचा लेखाजोखा मांडणारा ‘विधानपरिषद कामकाज : माझा सहभाग’ या पुस्तकाचा चौथा खंड म्हणजे महाराष्ट्रातील सामाजिक प्रश्नांचा जिवंत दस्तऐवज असल्याचे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.

    या खंडात २०१४ ते २०२० या कालावधीतील सभागृहातील भाषणे, अर्थसंकल्पावरील चर्चा, जनहिताचे प्रश्न आणि सरकारकडे केलेला पाठपुरावा यांचा समावेश आहे. महिला आणि बालकांची सुरक्षितता, कुपोषण, आरोग्य, शिक्षण, शेतकरी, कामगार, दुष्काळ, पुनर्वसन, पर्यावरण आदी विषयांना या पुस्तकात स्थान देण्यात आले आहे.

    महिलांच्या प्रश्नांवर डॉ. गोऱ्हे यांनी केवळ सभागृहात भाषणे न करता प्रत्यक्ष कृतीतूनही काम केले आहे. अन्यायग्रस्त महिलांना वैद्यकीय मदत, समुपदेशन आणि कायदेशीर आधार मिळावा, तसेच त्यांच्या पुनर्वसनाला प्राधान्य मिळावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले. ऊसतोड महिला कामगारांच्या आरोग्याचा प्रश्नही त्यांनी संवेदनशीलतेने हाताळला आहे, असे शिंदे यांनी नमूद केले.

    लोकप्रतिनिधी आणि पीठासीन अधिकारी अशा दोन्ही भूमिका डॉ. गोऱ्हे यांनी समर्थपणे पार पाडल्या आहेत. त्यांच्याकडे असलेला अभ्यास, संयम आणि संसदीय नियमांची जाण नव्या आमदारांसाठी मार्गदर्शक आहे. सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासक आणि विद्यार्थ्यांनाही या पुस्तकातून लोकांचे प्रश्न सभागृहात कसे मांडावेत, सरकारकडून माहिती कशी मागवावी आणि प्रश्नांचा पाठपुरावा कसा करावा, याची दिशा मिळेल. त्यांची आतापर्यंत २९ पुस्तके प्रकाशित झाली आहेत, ही अभिमानाची बाब असल्याचेही उपमुख्यमंत्री म्हणाले.

    शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सामान्य माणसाच्या संकटात खंबीरपणे उभे राहण्याची शिकवण दिली. हाच जनसेवेचा संस्कार डॉ. गोऱ्हे यांनी आपल्या कृतीतून जपला आहे. एखाद्या महिलेच्या समस्येच्या मुळाशी जाऊन व्यवस्थेत कोणता धोरणात्मक बदल आवश्यक आहे, हे ओळखून तो विषय सभागृहात मांडण्याचे त्यांचे कार्य या पुस्तकातून दिसून येते, असेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

    सभागृहाचे कामकाज नियम आणि शिस्तीने हाताळण्याचे नीलमताईंचे कार्य प्रेरणादायी – विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर

    डॉ. नीलम गोऱ्हे या राज्यासाठी आणि विधिमंडळासाठी महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व आहेत. विधानपरिषदेवर सलग पाच वेळा निवडून येणे ही ऐतिहासिक कामगिरी आहे. लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना त्यांनी सभागृहातील सर्व नियमांचे पालन केले. प्रत्येक वेळी सभागृहात बोलताना संबंधित नियमांचा स्पष्ट उल्लेख करून आपली भूमिका मांडली. विधानपरिषदेच्या उपसभापती म्हणूनही त्यांनी गौरवशाली कामगिरी केली आहे, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले.

    लोकप्रतिनिधींनी आपल्या कार्याचा लेखाजोखा जनतेसमोर मांडणे आवश्यक आहे. सभागृहातील गोंधळाला अधिक प्रसिद्धी मिळते; मात्र लोकप्रतिनिधींनी केलेल्या विधायक कामांकडे तुलनेने कमी लक्ष दिले जाते. डॉ. गोऱ्हे यांच्या पुस्तकातून ही उणीव भरून निघेल. त्यांनी सभागृहात उपस्थित केलेले ज्वलंत प्रश्न, त्यावरील चर्चा आणि प्रश्नांचा अंतिम निकाल लागेपर्यंत केलेला पाठपुरावा यांची सविस्तर माहिती या पुस्तकातून मिळते. हे पुस्तक भविष्यातील लोकप्रतिनिधींसाठीही उपयुक्त ठरेल, असा विश्वास नार्वेकर यांनी व्यक्त केला.

    लोकप्रतिनिधींच्या कामाचा लेखाजोखा जनतेपर्यंत पोहोचावा हा पुस्तकाचा उद्देश – डॉ. नीलम गोऱ्हे

    विधानपरिषदेतील कामकाजाचा अनुभव आणि लोकहिताच्या प्रश्नांवर केलेले कार्य जनतेसमोर यावे, या उद्देशाने या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्यावर विश्वास दाखवून २००२, २००८ आणि २०१४ मध्ये विधानपरिषदेवर काम करण्याची संधी दिली. त्यानंतर २०२० आणि २०२६ मध्येही विधानपरिषदेवर काम करण्याची संधी मिळाली. या प्रवासात सभापती, सहकारी सदस्य आणि विविध मंत्र्यांचे सहकार्य लाभले, असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

    २०१४ ते २०२० या कालावधीतील सभागृहातील कामकाजाचे संकलन आणि संपादन करण्यासाठी सुमारे अडीच वर्षे लागली. महिलांवरील आणि बालकांवरील अत्याचार, कायदे, विधेयके, तारांकित प्रश्न, प्रस्ताव, पुरवणी मागण्या, अर्धा तास चर्चा, वैधानिक समित्यांचे काम आणि आमदार म्हणून केलेल्या विविध कामांचा समावेश या पुस्तकात करण्यात आला आहे. आरक्षण नसतानाही पाच वेळा विधानपरिषदेवर काम करण्याची संधी मिळणे ही महत्त्वाची बाब आहे. आमदार नेमके कोणते काम करतात, हे जनतेला समजावे, हा या पुस्तकामागील प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

    विधानपरिषदेतील कामकाजात विविध मुख्यमंत्र्यांबरोबरच मंत्र्यांकडून मिळालेला अनुभव महत्त्वाचा आहे. सभागृहात उपस्थित केलेले प्रश्न आणि त्यांना मिळालेली उत्तरे यांतून लोकहिताच्या विषयांना पुढे नेण्याची संधी मिळाली. माध्यमांच्या माध्यमातूनही अनेक प्रश्न जनतेपर्यंत पोहोचतात. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी उपस्थित केलेले मुद्दे माध्यमांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे, असेही डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. उपस्थित मान्यवर, सहकारी आणि कार्यकर्त्यांचे आभार मानून त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

    यावेळी विधानपरिषदेच्या माजी उपसभापती तथा आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील मान्यवर, लोकप्रतिनिधी, साहित्यिक, अधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

    ०००००

     

    - Advertisement -