११ लाखांहून अधिक रुग्णांना आयुष्मान भारत व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ – महासंवाद

    - Advertisement -

    • २ हजार ८६९ कोटी खर्च
    • राज्यातील प्रत्येक कुटुंबाला वर्षाला पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार; ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त आरोग्य संरक्षण

    मुंबई, दि. २३ : आयुष्मान भारत–प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना यांच्या एकत्रित अंमलबजावणीमुळे राज्यातील प्रत्येक कुटुंबाला प्रतिवर्ष पाच लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार उपलब्ध झाले आहेत. या दोन्ही आरोग्य योजनेंतर्गत जानेवारी ते नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ११ लाखांहून अधिक लाभार्थ्यांनी १७ लाखांहून अधिक उपचारांचा लाभ घेतला आहे. या कालावधीत शासनाने उपचारांसाठी २ हजार ८६९ कोटी ४५ लाख रुपये खर्च केले आहेत.

    आरोग्य हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार असून, आर्थिक परिस्थितीमुळे कोणालाही उपचारांपासून वंचित राहावे लागू नये, या उद्देशाने महाराष्ट्र शासन आरोग्य संरक्षणाच्या महत्वाकांक्षी योजना राबवित आहे. राज्यातील सर्व अधिवासी कुटुंबांना व्यापक आरोग्य संरक्षण देणे, गंभीर आजारांवरील मोफत उपचार सुलभ करणे आणि पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजनेचा लाभ पोहोचविणे हा योजनेचा व्यापक उद्देश आहे.

    एकत्रित योजनेंतर्गत प्रत्येक कुटुंबाला प्रतिवर्ष पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार दिले जातात. तर ‘आयुष्मान वय वंदना’ योजनेंतर्गत ७० वर्षे व त्यावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त पाच लाख रुपयांचे आरोग्य संरक्षण उपलब्ध आहे. महाराष्ट्र शासनाच्या २८ जुलै २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना राज्यातील सर्व कुटुंबांसाठी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे पांढऱ्या शिधापत्रिकाधारकांसह राज्यातील सर्व अधिवासी कुटुंबे योजनेंतर्गत आरोग्य उपचारांचा लाभ घेण्यास पात्र आहेत.

    पाच हजारांपेक्षा अधिक रुग्णालये अंगिकृत

    राज्यातील पाच हजारांपेक्षा अधिक शासकीय व खासगी अंगीकृत रुग्णालयांमध्ये योजनेंतर्गत मोफत उपचार उपलब्ध आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रे, शासकीय व खासगी अंगीकृत रुग्णालये तसेच सर्व महानगरपालिका रुग्णालयांतून पात्र लाभार्थ्यांना उपचारांची सुविधा दिली जाते.

    एकत्रित योजनेंतर्गत २ हजार ३९९ प्रकारच्या शस्त्रक्रिया व उपचार पद्धती उपलब्ध आहेत. कर्करोग, हृदयरोग, मूत्रपिंड विकार, अवयव प्रत्यारोपण, न्यूरोसर्जरी, अपघात आणि गंभीर दुखापतींसह विविध गंभीर आजारांवर उपचार व शस्त्रक्रिया केल्या जातात. हृदय, फुफ्फुस, यकृत व अन्य अवयव प्रत्यारोपणासह नऊ दुर्धर आजारांवरील पात्र रुग्णांना कॉर्पस निधीतून ९.५ लाख ते २२ लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य उपलब्ध आहे.

    राज्यात आज अखेर एकूण ४ कोटी ४५ लाख लाभार्थ्यांची आयुष्मान कार्डे आणि १२ लाख २० हजार ज्येष्ठ नागरिकांची वय वंदना कार्डे तयार करण्यात आली आहेत. जानेवारी २०२६ पासून आजपर्यंत ७० लाख ८८ हजार ६९१ आयुष्मान कार्डे आणि ६ लाख ६ हजार ८५५ वय वंदना कार्डे तयार करण्यात आली आहेत. या कालावधीत एकूण २५ लाख ४२ हजार ५४४ कार्डे लाभार्थ्यांना वितरित करण्यात आली आहेत.

    आयुष्मान कार्ड तयार करण्यासाठी अद्ययावत शिधापत्रिका, आधार क्रमांक आणि आधारशी संलग्न मोबाईल क्रमांक आवश्यक आहे. सद्यस्थितीत आशा कर्मचारी, आपले सरकार सेवा केंद्रातील कर्मचारी आणि स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत कार्डनिर्मितीचे काम सुरू आहे. लाभार्थ्यांना राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या लाभार्थी संकेतस्थळावरून तसेच आयुष्मान ॲपद्वारे स्वतःचे कार्ड तयार करता येते.

    योजनेची माहिती किंवा तक्रारींसाठी लाभार्थ्यांनी जवळच्या अंगीकृत रुग्णालयातील आरोग्यमित्र किंवा जिल्हा समन्वयक यांच्याशी संपर्क साधावा. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसाठी १५५३८८ किंवा १८००२३३२२००, तर आयुष्मान भारत–प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसाठी १४५५५ किंवा १८००१११५६५ या टोल फ्री क्रमांकांवर संपर्क साधता येईल.

    ०००००

    मनिषा सावळे/विसंअ

    - Advertisement -