
धुळे, दि. ३० सप्टेंबर : शिंदखेड्याच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू दिलेली नाही. आता उपलब्ध निधीतून पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, भुयारी गटार आणि नागरी सुविधांची कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण झाली पाहिजेत. गावात बालाजीचा रथ ओढताना जसे सर्वजण एकत्र येतात, तसेच शहराच्या विकासाचा रथ पुढे नेण्यासाठी मतभेद बाजूला ठेवून नागरिक, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने एकत्र आले पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले.
शिंदखेडा नगरपंचायतीला स्वच्छ भारत अभियानांतर्गत प्राप्त झालेल्या मैला उपसा वाहनाचे लोकार्पण पालकमंत्री श्री. रावल यांच्या हस्ते झाले. यावेळी शिंदखेडा नगरपंचायतीच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा श्रीमती कलावती माळी, उपनगराध्यक्ष उदय देसले, तहसीलदार नितीनकुमार देवरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, सार्वजनिक बांधकाम समितीचे सभापती मनोहर पाटील, स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य समितीच्या सभापती श्रीमती संगिता भिल, पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापती श्रीमती पूनम मराठे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती श्रीमती आरेफाबी कुरेशी, डी. एस. गिरासे, अनिल वानखेडे, नगरसेविका श्रीमती वंदना गिरासे, माजी उपनगराध्यक्ष भिला पाटील, प्रविण माळी, मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर, सचिन वाघ तसेच नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
श्री. रावल म्हणाले, शिंदखेडा ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर 19 जुलै 2012 रोजी झाल्यानंतर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळाली. नगरपंचायत झाल्यामुळे केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांमधून मोठ्या प्रमाणावर निधी मिळण्याचा मार्ग खुला झाला. गेल्या 14 वर्षांत पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, प्रशासकीय सुविधा आणि शहर सौंदर्यीकरणाच्या अनेक कामांना चालना मिळाली आहे.
शहराच्या पाणीप्रश्नाचा उल्लेख करताना ते म्हणाले की, शिंदखेडा हा सातत्याने दुष्काळाचा सामना करणारा भाग आहे. येथील जनतेला पाण्याची अडचण काय असते, याचा दीर्घ अनुभव आहे. त्यामुळे नागरिकांना नियमित आणि पुरेसे पिण्याचे पाणी मिळणे ही सर्वांत मोठी प्राथमिकता असली पाहिजे. पहिल्या टप्प्यात सुमारे 21 कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. त्यानंतर सुमारे 23 कोटी रुपयांची दुसरी पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे. या योजनांची कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करून नागरिकांना किमान एक दिवसाआड तरी मुबलक पाणी मिळेल, याची दक्षता नगरपालिका प्रशासनाने घ्यावी.
सुलवाडे-जामफळ योजनेचे पाणी केवळ घराघरांपर्यंत नव्हे, तर शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचले पाहिजे, असे सांगून श्री. रावल म्हणाले की, दुष्काळी भागाच्या विकासासाठी पिण्याचे पाणी आणि सिंचन या दोन्ही बाबींचे दीर्घकालीन नियोजन करावे लागेल. शासनाने निधी उपलब्ध करून दिल्यानंतर काम करणाऱ्या एजन्सीकडून गुणवत्तापूर्ण काम करून घेणे, कामावर बारीक लक्ष ठेवणे आणि नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेणे प्रशासनाची जबाबदारी आहे.
शिंदखेडा शहरासाठी सुमारे 96 कोटी रुपयांच्या भुयारी गटार योजनेचा प्रस्ताव पुढे नेण्यात येत असून त्यासाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. दोंडाईचा आणि शिंदखेडा या दोन्ही शहरांच्या योजना मंजूर व्हाव्यात, यासाठी मुख्यमंत्री स्तरावरही विनंती करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. भुयारी गटार व्यवस्था पूर्ण झाल्यानंतर शहरातील सांडपाणी, आरोग्य आणि स्वच्छतेशी संबंधित अनेक प्रश्न मार्गी लागतील. घनकचरा आणि मैला व्यवस्थापनासाठी आवश्यक जागाही नगरपंचायतीकडे उपलब्ध करून देण्यात आली असून संबंधित प्रकल्पांची कामे पुढे नेण्यात येत आहेत.
आज लोकार्पण करण्यात आलेले मैला उपसा वाहन 3,000 लिटर क्षमतेचे असून त्यात 2,500 लिटर मैला साठवण क्षमता आणि 500 लिटर स्वच्छ पाण्याची स्वतंत्र व्यवस्था आहे. त्यामुळे सेप्टिक टँकमधील मैला यांत्रिक पद्धतीने उपसता येणार असून टँकच्या स्वच्छतेसाठी स्वतंत्र पाण्याचीही सुविधा उपलब्ध राहणार आहे. यामुळे सफाई कर्मचाऱ्यांचा मैल्याशी थेट संपर्क कमी होऊन त्यांचे आरोग्य आणि सुरक्षितता जपली जाईल. शहरातील दुर्गंधी, अस्वच्छता तसेच अनियंत्रित मैला विल्हेवाटीच्या समस्यांवर नियंत्रण मिळविण्यासही मदत होणार आहे.
“वाहन मिळाले म्हणजे जबाबदारी संपली असे समजू नका. ही शहराच्या जनतेची मालमत्ता आहे,” असे सांगत पालकमंत्र्यांनी वाहनासाठी जबाबदार चालक, नियमित देखभाल-दुरुस्ती आणि योग्य व्यवस्थापनाची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या. कोट्यवधी रुपयांत मिळालेली साधनसामग्री योग्य निगा न राखल्यामुळे नादुरुस्त होऊन पडून राहता कामा नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शहराचा पुढील 20 ते 25 वर्षांचा विचार करून पाणीपुरवठा, भुयारी गटार, सांडपाणी प्रक्रिया, मैला व्यवस्थापन आणि स्वच्छता या सुविधा एकमेकांना पूरक पद्धतीने उभ्या राहिल्या पाहिजेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकारांचा सन्मान राखून विकासकामांच्या प्रक्रियेत लोकनियुक्त नगराध्यक्ष, नगरसेवक आणि नगरपालिका प्रशासनाचा सहभाग असला पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.
शहरातील मुख्य रस्त्याचा मुद्दा उपस्थित करताना श्री. रावल म्हणाले की, दोंडाईचा आणि शिंदखेडा भागाच्या विकासासाठी पूर्वी उपलब्ध झालेल्या निधीपैकी 12 कोटी रुपये दोंडाईच्यासाठी तर 13 कोटी रुपये शिंदखेड्यासाठी देण्यात आले आहेत. शिंदखेड्यातील मुख्य रस्त्यासाठी निधी उपलब्ध आहे. रस्ता 12-13 फूट करायचा की 15 फूट, याबाबत व्यापारी, नागरिक, नगरसेवक आणि प्रशासनाने एकत्र बसून निर्णय घ्यावा. निधी उपलब्ध असताना केवळ चर्चा न करता प्रत्यक्ष काम पूर्ण करण्यावर भर दिला पाहिजे.
शहरातील विविध विकासकामांसाठी आणखी 1 कोटी 11 लाख रुपये आणि 1 कोटी 7 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. दलित वस्ती सुधार योजना आणि इतर योजनांमधील निधीचाही नियोजनबद्ध वापर करून शहरातील प्रत्येक भागापर्यंत विकास पोहोचवावा. सर्व घटकांना विश्वासात घेऊन विकासाचा मार्ग काढला तर मतभेदांमुळे कोणतेही काम अडणार नाही, असे त्यांनी सांगितले.
यावेळी श्री. रावल यांनी विकासातील समन्वयाचे महत्त्व अधोरेखित केले. “बालाजीचा रथ ओढताना संपूर्ण गाव एकत्र येते. त्याच भावनेतून शिंदखेड्याच्या विकासाचा रथही सर्वांनी मिळून ओढला पाहिजे. काही मोजक्या लोकांचा विरोध असेल, तरी बहुसंख्य विकासाभिमुख नागरिकांनी शहराच्या प्रगतीसाठी एकत्र आले पाहिजे. राजकीय स्पर्धा, चर्चा आणि मतभेद असू शकतात; मात्र त्यामुळे शहराच्या विकासाची गाडी थांबता कामा नये. दोन्ही बाजूंनी दोन पावले मागे घेऊन समन्वयातून मार्ग काढणे गरजेचे आहे,” असे ते म्हणाले.
नगरपालिका प्रशासनानेही लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि नागरिकांना जोडणारी समन्वयाची भूमिका प्रभावीपणे पार पाडावी. शासनस्तरावर निधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू; मात्र त्या निधीतून योग्य नियोजन, दर्जेदार काम आणि वेळेत प्रकल्प पूर्ण करून घेण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनाने पार पाडावी, असे त्यांनी सांगितले.
शहरात रस्त्यांचे काँक्रिटीकरण, बुराई नदीकाठ परिसराचे सुशोभीकरण, पथदिवे, महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांची कामे यासह विविध विकासकामे सुरू आहेत. शहरातील तहसील कार्यालय, पंचायत समिती, पोलीस ठाणे आणि अन्य प्रशासकीय कार्यालयांमुळे तालुका मुख्यालय म्हणून शिंदखेड्याची ओळख अधिक मजबूत झाली आहे.
आपली पंचायत समिती, तहसील कार्यालय आणि बाजार समितीच्या इमारती चांगल्या पद्धतीने उभ्या राहिल्या आहेत. आता शिंदखेडा नगरपंचायतीचीही नागरिकांना अभिमान वाटेल अशी स्वतंत्र, प्रशस्त आणि देखणी इमारत उभी राहिली पाहिजे. शहरातील उपलब्ध शासकीय जागांचा सुयोग्य वापर करून नगरपालिका कार्यालय, व्यापारी संकुल, इतर शासकीय कार्यालये तसेच अग्निशमन वाहन, रुग्णवाहिका आणि स्वच्छता वाहनांसाठी आवश्यक सुरक्षित सुविधा विकसित करता येतील, असे त्यांनी सांगितले.
शिंदखेड्याला यापूर्वी अग्निशमन वाहन आणि रुग्णवाहिका उपलब्ध झाली असून आता मैला उपसा वाहनाचीही भर पडली आहे. अशा सुविधा शहरात आणण्याबरोबरच त्यांची निगा आणि नियमित देखभाल करणे तेवढेच महत्त्वाचे आहे. नगरपंचायतीने आपल्या 14 वर्षांच्या प्रवासात अनेक विकासकामे केली असून तीन सार्वत्रिक निवडणुकाही पार पडल्या आहेत. शहराची स्वतंत्र ओळख आणि प्रतिष्ठा नागरिकांच्या मनात निर्माण व्हावी यासाठी नगरपंचायतीचे बोधचिन्हही तयार करण्यात आले आहे. विकास करताना शहराची ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामाजिक ओळखही जपली पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.
“आगामी काळात दुष्काळी परिस्थितीचा विचार करून पाण्याचे काटेकोर नियोजन करा, नियमित बैठका घ्या आणि नागरिकांना वेळेत पाणी मिळेल याची दक्षता घ्या. शहरासाठी मिळालेला कोट्यवधी रुपयांचा निधी टप्प्याटप्प्याने, नियोजनपूर्वक आणि दर्जेदार कामांवर खर्च करा. कामांची गुणवत्ता टिकवा आणि ती कामे जनतेला समर्पित करा,” असे आवाहन श्री. रावल यांनी केले.
पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, भुयारी गटार, सांडपाणी व मैला व्यवस्थापन आणि शहर सौंदर्यीकरणाची कामे एकत्रितपणे पुढे नेल्यास येत्या काही वर्षांत शिंदखेड्याचा उल्लेखनीय कायापालट झालेला दिसेल, असा विश्वास व्यक्त करत पालकमंत्री श्री. रावल यांनी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, विविध समित्यांचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी आणि शहरातील नागरिकांचे अभिनंदन केले.
०००००००

WhatsApp