हायलाइट्स:
- भाजपचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
- बंगाल निवडणुकीच्या भाष्यावर केली टीका
- करोना काळातील कामगिरीवरही उपस्थित केलं प्रश्नचिन्ह
‘उद्धव ठाकरे यांच्याकडून ममता बॅनर्जी यांचं कौतुक करण्यात आलं. ममता लढल्या व जिंकल्या याला म्हणतात स्वबळ…त्यामुळे बरोबर त्यांचं कौतुक आहेच… कारण त्यांनी समोरासमोर लढाई केली. सत्तेसाठी ज्यांच्या सोबत निवडणुका लढल्या त्यांचा विश्वासघात करत आयत्यावेळी युती मोडत विरोधकांसोबत जाऊन बसल्या नाहीत,’ असं म्हणत भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे.
करोना काळातील कामगिरीवरून आरोप-प्रत्यारोप
मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत, असा आक्षेप भाजपकडून वारंवार घेतला जातो. या आक्षेपाला उत्तर देत घराबाहेर न पडताही आपण मोठं काम केल्याचा दावा आज उद्धव ठाकरेंनी केला. यावर प्रत्युत्तर देताना केशव उपाध्ये म्हणाले की, ‘कोणतं काम उद्धव ठाकरेजी? महाराष्ट्रात सर्वाधिक करोना रुग्णसंख्या…मराठा आरक्षण कोर्टात न मांडल्याने गमावले…शेतकऱ्यांना मदत नाही..महाराष्ट्र थांबला नाही या जाहिरातीने तुमचं समाधान होत असेल महाराष्ट्राचा विकास ठप्प झाल्याची यादी मोठी आहे.’
पश्चिम बंगाल निवडणुकीबद्दल नक्की काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीवर भाष्य करत उद्धव ठाकरे यांनी बंगाली जनतेचं अभिनंदन केलं आहे. ‘बंगाली जनतेचं कौतुक आहे. कारण त्यांनी ताकद दाखवून दिली. निवडणूक काळात अनेक आरोप झाले, पण बंगाली माणसाने आपलं मत ठामपणे मांडलं. बंगाली माणसाने प्रादेशिक अस्मितेचं उदाहरण दाखवून दिलं,’ असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.