
बुलढाणा, दि. 11 (जिमाका) : अल-निनोच्या प्रभावामुळे राज्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली असून, खरिपाच्या
पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या संकटाच्या काळात शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून शेतकरी, महिला आणि ग्रामीण भागातील नागरिकांना आर्थिक आधार देऊन दुष्काळावर मात करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले.
खामगाव तालुक्यातील अतिदुर्गम व डोंगराळ घारोड गावात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. साऊएकल महिला पुनर्वसन समितीच्या वतीने आयोजित भाऊबीज कार्यक्रमानिमित्त दि. १० नोव्हेंबर रोजी रात्री केंद्रीय राज्यमंत्री श्री. जाधव यांनी घारोड येथे भेट देऊन शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी एकल निराधार महिला देवकाबाई अढाव आणि दुर्गा अनंता कड यांच्या घरी भेट देत त्यांच्यासोबत भाऊबीज साजरी केली.

यावेळी बोलताना केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव म्हणाले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा आर्थिक मदत मिळत असून,दुष्काळाच्या परिस्थितीत कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी ही योजना मोठा आधार ठरत आहे. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात. राज्य शासनानेहीत्यात अतिरिक्त मदतीची भर घातली आहे. तसेच दिवाळी अग्रीम म्हणून पाच हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करण्यात आलेआहेत.
दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासन विविध स्तरांवर उपाययोजना करीत आहे.शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याबरोबरच कर्जमाफी, नदीजोड प्रकल्प आणि जलसंधारणाच्या माध्यमातून दीर्घकालीन उपाययोजना करण्यावरही शासनाचा भर आहे. पाण्याची उपलब्धता वाढवून शेतीला सिंचनाची सुविधा मिळावी आणि भविष्यातीलदुष्काळी परिस्थितीचा प्रभाव कमी व्हावा, यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री जाधव यांनी देवकाबाई अढाव यांच्या घरी जाऊन भाऊबीजेची ओवाळणी स्वीकारली आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. एकल निराधार महिलेला भाऊ म्हणून आधार देण्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच शेतकऱ्यांसोबत बसूनत्यांच्या शेतीतील अडचणी, पिकांचे नुकसान, पाणीटंचाई, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न, कर्जाचा बोजा आणि शासनाकडून मिळालेल्या मदतीबाबत सविस्तर चर्चा केली.
घारोड हे अतिदुर्गम डोंगराळ भागातील गाव असून, दुष्काळाचा मोठा फटका येथील शेतकऱ्यांना बसला आहे. अशा परिस्थितीतकेंद्रीय राज्यमंत्र्यांनी थेट शेतकऱ्यांच्या घरी जाऊन दिवाळी साजरी केल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण होते. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेऊन त्या केंद्र व राज्य शासनाच्या स्तरावर मांडण्यासाठी अशा संवादात्मक कार्यक्रमांचे आयोजनकरण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
दरम्यान, घारोड गावातील पाणीपुरवठा योजनेच्या अपूर्ण कामासंदर्भातही महत्त्वपूर्ण निर्णयाची माहिती देण्यात आली. जलजीवनमिशनअंतर्गत अपूर्ण असलेल्या पाणीपुरवठा योजनेस राज्य शासनाच्या पाणीपुरवठा विभागाने सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान केलीआहे. या मंजुरीचे पत्र केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी ग्रामपंचायतीचे सरपंच वैभव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केले.
यावेळी सरपंच वैभव ठाकरे, ॲड. अमोल अंधारे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

WhatsApp