शेतकऱ्यांसोबत दिवाळी, बांधावरून संवाद! – महासंवाद

    - Advertisement -

    दिवाळीचा सण म्हणजे प्रकाशाचा, आनंदाचा आणि नव्या आशांचा उत्सव. मात्र शेतकऱ्याच्या आयुष्यात हा प्रकाश तेव्हाच खऱ्या अर्थाने उजळतो, जेव्हा त्याच्या शेतात पीक डोलते, घरात समाधान असते आणि उद्याची चिंता नसते. यंदा मात्र निसर्गाच्या लहरीपणाने शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण पडले. पाऊस नसल्याने शेतातील पिके करपली, फळबागा संकटात सापडल्या आणि शेतीच्या भविष्याबद्दल चिंता वाढली. अशा परिस्थितीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीचा आनंद शेतकऱ्यांसोबत साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील लोहारी सावंगा या गावी मुक्काम केला. मुख्यमंत्र्यांचा हा दौरा केवळ सण साजरा करण्यापुरता नव्हता, तर ग्रामीण भागातील जगण्याचा संघर्ष, शेतकऱ्यांच्या वेदना आणि त्यांच्या अपेक्षा समजून घेण्याचा एक सकारात्मक प्रयत्न होता.

    नरखेड तालुक्यातील लोहारी सावंगा हे शेतीला केंद्रस्थानी ठेवून जगणारे गाव. १९४८ मध्ये स्थापन झालेल्या ग्रामपंचायतीचा ग्रामविकासाचा प्रवास आजही सुरू आहे. २०११ च्या जनगणनेनुसार ४ हजार २६४ लोकसंख्या आणि ८४४ कुटुंबे असलेल्या या गावाची अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहे. कापूस, तूर, सोयाबीन, हरभरा, गहू यांसोबत संत्रा आणि मोसंबीच्या बागाही येथील शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा आधार आहेत.

    ७ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री गावात दाखल झाले, तेव्हा ग्रामस्थांच्या उत्साहाला उधाण आले होते. महिलांनी पारंपरिक पद्धतीने त्यांचे स्वागत केले. गुरुदेव सेवा मंडळाच्या प्रार्थनासभेत सहभागी होत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना अभिवादन केले. गुरुकुंज मोझरी येथील भजन मंडळाच्या सादरीकरणाने वातावरण भक्तिमय झाले. राष्ट्रसंतांची ग्रामगीता केवळ आध्यात्मिक विचार मांडत नाही, तर गावाच्या सर्वांगीण विकासाचा मार्गही दाखवते. संकटाच्या काळात माणसाला उभे राहण्याचे बळ देणारे हे विचार या प्रसंगी अधिकच समर्पक ठरले.

    या भेटीचे सर्वाधिक भावनिक वैशिष्ट्य म्हणजे मुख्यमंत्र्यांनी लोहारी सावंगा या गावातील शेतकरी रामभाऊ बालपांडे यांच्या घरी केलेला रात्रभर मुक्काम. राज्यात सत्तेच्या सर्वोच्च पदावर असलेली व्यक्ती आपल्या घरात येणार, ही बाब बालपांडे कुटुंबासाठी आनंदाची आणि अभिमानाची होती. घरातील सदस्यांनी पारंपरिक पद्धतीने त्यांचे स्वागत केले. मुख्यमंत्र्यांनी कुटुंबियांशी आपुलकीने संवाद साधला आणि घरातील वातावरणात सहभागी होत भोजन केले.

    ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबाच्या घरात बसून भोजन करणे आणि त्यांच्यासोबत वेळ घालवणे, हा या दौऱ्यातील महत्त्वाचा भाग ठरला. मुख्यमंत्र्यांच्या या साधेपणामुळे गावातील नागरिकांनाही जवळीक जाणवली. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमुळे गावातील महिलांनाही विशेष आनंद झाला. आजवर प्रत्यक्ष मुख्यमंत्री पाहण्याची संधी न मिळालेल्या अनेक महिलांसाठी हा अनुभव अविस्मरणीय ठरला.

    मात्र या भेटीचे आणखी एक अधोरेखित करणारे महत्त्व होते ते शेतकऱ्यांच्या प्रश्नांना मिळालेल्या व्यासपीठाचे. पिकांचे नुकसान, सिंचनाची कमतरता, वन्यप्राण्यांचा उपद्रव, संत्रा उत्पादकांच्या अडचणी आणि गावातील मूलभूत सुविधांचे प्रश्न गावकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडले. दहा शेतकऱ्यांना सिंचन विहिरींचा लाभ, २४३.३५ लाख रुपयांच्या साठवण तलावाचा प्रस्ताव, खोरी प्रकल्पाला मान्यता आणि विंधन विहिरींबाबत घेतलेला निर्णय यामुळे पाण्याच्या प्रश्नावर दीर्घकालीन उपाययोजनांची अपेक्षा निर्माण झाली.

    नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान, दुष्काळी मदत आणि वीजबिल माफी यांसारख्या उपाययोजनांचाही उल्लेख झाला. दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी केवळ गावातील बैठकीपुरते स्वतःला मर्यादित ठेवले नाही. ८ नोव्हेंबर रोजी सोनेगाव रिठी आणि कोहळी येथे शेतांच्या बांधावर जाऊन कापूस आणि तूर पिकांची पाहणी केली. दिलीप सरोदे आणि बाबुराव काळे यांच्यासारख्या शेतकऱ्यांच्या अडचणी प्रत्यक्ष जाणून घेतल्या. उन्हात शेतात उभे राहून पिकांची अवस्था पाहणे, हा शेतकऱ्यांच्या जगण्याशी जोडलेला संवाद होता. कारण शेतकऱ्यांच्या अडचणींची खरी तीव्रता कागदावरील आकडेवारीपेक्षा बांधावर अधिक स्पष्टपणे दिसून आली.

    लोहारी सावंग्याचा हा दौरा ग्रामीण महाराष्ट्राच्या वास्तवाचे दर्शन घडवणारा ठरला. गावाचा विकास केवळ रस्ते, इमारती आणि योजनांच्या आकडेवारीत मोजता येत नाही. शेतकऱ्याला पाणी मिळणे, त्याच्या पिकाला संरक्षण मिळणे, उत्पादनाला बाजारपेठ मिळणे आणि संकटाच्या काळात शासनाचा आधार मिळणे यातच खऱ्या ग्रामविकासाचे सार दडलेले आहे.

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लोहारी सावंगा येथील दिवाळी मुक्कामाने दिवाळीच्या प्रकाशात शेतकऱ्यांच्या मनातील चिंतेचे सावट दूर करण्यासाठी दिलेला विश्वास नक्कीच आश्वासक ठरणारा आहे.

    – अतुल पांडे,

    सहायक संचालक (माहिती)

    - Advertisement -