अनेक प्रस्थापित चेहरे सध्या मालिकांमध्ये दिसत आहेत. लोकप्रिय कलाकारांचा चाहतावर्ग पाहता टीव्हीवरील मालिका, कार्यक्रमांना चांगली पसंती मिळू शकते. म्हणून अनेक मोठे चेहरे सध्या छोट्या पडद्यावर दिसत आहेत. उमेश कामात, मुक्ता बर्वे, सचिन खेडेकर, अजिंक्य देव, संजय नार्वेकर ही कलाकार मंडळी टीव्हीवर झळकताहेत.
आता या यादीत आणखी दोन कलाकारांची भर पडणार आहे. श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहेरे ही जोडी एका मालिकेत दिसणार आहे, अशी चर्चा आहे. ही नवीन मालिका लवकरच सुरू होणार असून त्यामध्ये हे दोघंही मुख्य भूमिकेत झळकणार असल्याचं कळतं. याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झाली नसली तरी काही दिवसांतच मालिकेची पहिली झलक बघायला मिळेल असं बोललं जातंय.
श्रेयस आणि प्रार्थना या मालिकेच्या निमित्तानं बऱ्याच वर्षांनी टीव्हीविश्वात पुनरागमन करताहेत. दोघांनी याच माध्यमापासून करिअरची सुरुवात केली होती. आता पुन्हा एकदा त्यांना मालिकेत बघण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.