
रायगड-अलिबाग,दि.८ :- पश्चिम आणि पूर्व समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिका पूर्ण झाल्यामुळे देशाच्या मालवाहतूक क्षेत्रात ऐतिहासिक परिवर्तन घडत आहे. जेएनपीटी बंदरातून डबल-स्टॅक कंटेनर पहिली मालगाडी मार्गस्थ होणे, ही या परिवर्तनाची महत्त्वपूर्ण कामगिरी आहे. यामुळे एका मालगाडीमधून मुंबईहून 250 पेक्षा अधिक ट्रकइतका माल वेगाने वाहून नेता येणार आहे. त्यामुळे मालवाहतुकीचा वेळ व खर्च कमी होईल. ही बाब देशाच्या लॉजिस्टीक व्यवस्थेला एक नवी गती व दिशा देणारी ठरेल, असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज येथे केले.
पश्चिम समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिकेच्या 326 किमी लांबीच्या आणि 20 हजार 700 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या तीन महत्त्वपूर्ण टप्प्यांच्या राष्ट्रार्पण प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. दरम्यान व्ही.सी.द्वारे डबल स्टेक मालगाडीला हिरवा झेंडा दाखवून राष्ट्राला समर्पित केले.
उरण येथील जेएनपीए येथे आयोजित कार्यक्रमास राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, रोजगार हमी योजना मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री भरतशेठ गोगावले, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी, जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, नगराध्यक्षा भावना घाणेकर, राज्यपाल महोदयांचे विशेष कार्य अधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे, जपानच्या मुंबईस्थित वाणिज्य दूतावासाच्या महावाणिज्यदूत श्रीमती सातो हितोमी, डीएफसीसीआयएलचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीण कुमार,विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, जिल्हाधिकारी किशन जावळे, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, मध्य रेल्वेचे महाप्रबंधक राजीव श्रीवास्तव, प्रांताधिकारी पवन चांडक आदींची प्रमुख उपस्थिती होती.
प्रधानमंत्री श्री.मोदी यांनी देशामध्ये 2014 नंतर पायाभूत सुविधांच्या विकासाला मिळालेल्या वेगाचा उल्लेख करताना पूर्व आणि पश्चिम समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिका यशस्वीपणे पूर्ण झाल्याचे सांगितले. ही मार्गिका देशाच्या व्यापारी व्यवस्थेत मूलभूत परिवर्तन घडवून आणत असून त्या राष्ट्रीय व्यापाराचा आधार बनत असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रवासी आणि मालवाहतूक रेल्वे स्वतंत्र झाल्यामुळे दररोज 430 पेक्षा अधिक मालगाड्या धावू शकतात. ट्रकने लागणारा सुमारे 30 तासांचा प्रवास आता 10 ते 12 तासांत पूर्ण होऊ शकतो. 100 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी लागणारा वेळ पूर्वीच्या तुलनेत निम्म्यापेक्षाही कमी झाला आहे. त्यामुळे इंधनाची बचत, मालवाहतुकीच्या खर्चात घट आणि पर्यावरणाचे संरक्षण यांसारखे अनेक फायदे होत आहेत. एका मार्गिकेत गुंतवणूक केली, मात्र त्यातून अनेक फायदे मिळाले, असेही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले.
विस्तारित मालवाहतूक नेटवर्कमुळे कृषी क्षेत्रालाही मोठा फायदा होणार आहे. पूर्व आणि पश्चिम भारतातील शेतकऱ्यांना नाशवंत कृषी उत्पादने मोठ्या बाजारपेठांमध्ये वेगाने पोहोचवणे आता शक्य होत आहे. हंगामी फुले, भाजीपाला आणि फळे वेळेवर ग्राहकांपर्यंत तसेच मंडईपर्यंत पोहोचत आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होत असल्याचे त्यांनी सांगितले.
गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील दुर्गम आदिवासी भागांपर्यंत रेल्वे सेवा पोहोचविण्यासाठी सरकारकडून सातत्याने प्रयत्न केले जात असल्याचे सांगत प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणाले, छोटा उदयपूर आणि अलीराजपूर येथे प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा फायदा होईल अशा नव्या रेल्वे सेवेचा त्यांनी उल्लेख केला. “ज्या भारताच्या भागांमध्ये अनेक दशकांपासून रेल्वे पोहोचली नव्हती, त्या भागांमध्ये आता रेल्वे पोहोचत आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
रस्ते, मेट्रो, विमानतळ आणि गॅस पाईपलाईन यांसारख्या पायाभूत सुविधांच्या विकासामुळे होणाऱ्या व्यापक आर्थिक परिणामांचा उल्लेख करताना पंतप्रधानांनी 2 कोटी 75 लाख कोटींपेक्षा अधिक असलेल्या ऐतिहासिक रेल्वे अर्थसंकल्पाचा उल्लेख केला. पायाभूत सुविधांवरील खर्चामुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. गरिबांसाठी घरे बांधणे, बंदरांचा विस्तार करणे यामुळे आसपासच्या परिसरात नवीन उद्योग आणि व्यवसाय विकसित होतात. रेल्वेच्या आधुनिकीकरणावर होणारा खर्च मोठ्या प्रमाणात नवीन रोजगार निर्माण करत असल्याचेही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले.
गेल्या दशकातील भारताच्या वाढत्या औद्योगिक क्षमतेचा उल्लेख करताना ते म्हणाले, सन 2014 पासून भारताने 50 हजार आधुनिक रेल्वे डबे तयार केले असून जवळपास 2 लाख 5 हजार वॅगन रेल्वे नेटवर्कमध्ये समाविष्ट केल्या आहेत. भारत हा रेल्वे डबे, मेट्रो डबे आणि रेल्वे इंजिनचा प्रमुख उत्पादक देश बनला असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
महत्त्वाच्या पुरवठा साखळ्यांमध्ये आत्मनिर्भर होण्याच्या प्रयत्नांवर भर देताना पंतप्रधानांनी सौर पीव्ही मॉड्यूल्सच्या देशांतर्गत उत्पादनाचा उल्लेख करत पूर्वी मोठ्या प्रमाणावर आयात करावी लागणारी ही उपकरणे आता देशातच तयार होत असल्याने आयातीवरील खर्च कमी झाला असून 200 जीडब्ल्यूची मोठी क्षमता निर्माण झाली असल्याचेही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नमूद केले.
डेटा सेंटर आणि कृत्रिम बुद्धिमत्तासारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानासाठी मजबूत वीज व्यवस्था आवश्यक असल्याचे अधोरेखित करताना प्रधानमंत्री यांनी युरेनियम, महत्त्वाची खनिजे आणि दुर्मिळ पृथ्वी मूलद्रव्ये यासाठी आंतरराष्ट्रीय करार केले जात आहेत. भारताला कृत्रिम बुद्धीमत्ता क्षेत्रातील जागतिक महासत्ता बनवायचे असल्यास आवश्यक पायाभूत सुविधा उभारणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता हे केवळ माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रापुरते मर्यादित नसून भविष्यातील मूलभूत क्षमता आहे. शेती, आरोग्यसेवा आणि रोबोटिक्स यांसारख्या क्षेत्रांमध्ये नवकल्पना घडवून आणण्यासाठी कुशल युवकांची मोठी फळी तयार करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर व्यापक अभियान राबविण्याची घोषणा करत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान आत्मसात केल्यामुळे उत्पादनक्षमता वाढेल आणि नाविन्यपूर्ण स्टार्टअप्सना चालना मिळेल, असेही ते म्हणाले.
समर्पित मालवाहतूक मार्गिका नेटवर्क पूर्ण होणे ही ऐतिहासिक उपलब्धी – राज्यपाल जिष्णु देव वर्मा
याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना राज्यपाल जिष्णु देव वर्मा म्हणाले, पूर्व समर्पित मालवाहतूक मार्गिका यापूर्वीच कार्यान्वित झाली असून, पश्चिम समर्पित मालवाहतूक मार्गिकेच्या पूर्णत्वामुळे देशातील संपूर्ण समर्पित मालवाहतूक मार्गिका नेटवर्क आता पूर्ण झाले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली देशाच्या वाहतूक व लॉजिस्टिक्स पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणाच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची आणि ऐतिहासिक उपलब्धी आहे.
मालवाहतुकीसाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध झाल्यामुळे विद्यमान रेल्वे मार्गावरील प्रवासी रेल्वेगाड्यांना अधिक वेगाने आणि वेळेत धावण्यास मदत होणार असल्याचे ते म्हणाले.
समर्पित मालवाहतूक मार्गिकेमुळे रस्ते वाहतुकीऐवजी रेल्वे वाहतुकीकडे मालवाहतुकीचा कल वाढेल, रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी होईल, लॉजिस्टिक्सचा खर्च घटेल आणि देशातील पुरवठा साखळी अधिक कार्यक्षम होण्यास मदत मिळेल. रायगड, ठाणे आणि पालघर या तीन जिल्ह्यांतून सुमारे 178 मार्ग किलोमीटर लांबीची ही मार्गिका जात असून, महाराष्ट्रातील प्रकल्पाच्या भागासाठी जमिनीच्या खर्चासह 10 हजार कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक करण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण प्रकल्पामुळे विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वासही राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी यावेळी व्यक्त केला.
२०३० पर्यंत जेएनपीटी हे देशातील दशलक्ष टीइयूपेक्षा अधिक क्षमता असलेले पहिले बंदर ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, जेएनपीटीला देशाच्या विस्तीर्ण भूभागाशी जोडणारी पश्चिम समर्पित मालवाहतूक मार्गिका कार्यान्वित झाल्यामुळे महाराष्ट्राच्या लॉजिस्टिक्स क्षमतेला मोठी चालना मिळणार आहे. या माध्यमातून देशातील सुमारे 55 टक्के कंटेनर वाहतूक हाताळणाऱ्या जेएनपीटीच्या माध्यमातून होणाऱ्या मालवाहतुकीत या मार्गिकेमुळे मोठी वाढ होईल.
एप्रिल ते ऑगस्टदरम्यान जेएनपीटीने सुमारे 38.27 लाख टीईयू कंटेनर हाताळले असून समर्पित मालवाहतूक मार्गिका पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर या वाहतुकीला आणखी गती मिळेल.
येत्या 2030 पर्यंत जेएनपीटी हे देशातील दशलक्ष टीईयूपेक्षा अधिक क्षमता असलेले पहिले बंदर ठरेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
श्री.फडणवीस पुढे म्हणाले, दादरी, उत्तर प्रदेश ते जेएनपीटी या पश्चिम समर्पित मालवाहतूक मार्गिकेतील जेएनपीटी ते न्यू उमरगाव हा अत्यंत महत्त्वाचा भाग आज कार्यान्वित होत आहे. सुमारे 1 हजार 500 किमी लांबीची ही मार्गिका उत्तर भारताला पश्चिम भारताशी जोडत असून, पश्चिम किनारपट्टीवरील जेएनपीटीसारख्या महत्त्वाच्या बंदराचा लॉजिस्टिक्सचा लाभ देशाच्या मोठ्या भूभागाला मिळणार आहे. महाराष्ट्रातील या मार्गासाठी सुमारे 10 हजार कोटींची गुंतवणूक असून, 178किमी लांबीचा मार्ग राज्यातून जात असल्याची माहितीही त्यांनी दिली.
जागतिक पुरवठा साखळीचा महत्त्वाचा भाग बनण्यासाठी देशातील लॉजिस्टिक्स खर्च कमी करणे आवश्यक आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील लॉजिस्टिक्स खर्चात घट झाली असून, समर्पित मालवाहतूक मार्गिका पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर तो आणखी कमी होईल. त्यामुळे भारताची जागतिक स्पर्धात्मकता वाढून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीला चालना मिळेल, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, जेएनपीटीच्या विस्तारासोबतच वाढवण बंदर विकसित होत असून, त्यामुळे महाराष्ट्राची सागरी क्षमता आणखी वाढणार आहे.
जेएनपीटी आणि वाढवणसारख्या बंदरांना सक्षम रेल्वे मालवाहतूक जोडणी मिळाल्याने महाराष्ट्राला देशातील महत्त्वाचे मॅरिटाईम पॉवर आणि जागतिक लॉजिस्टिक्स केंद्र म्हणून विकसित करण्यास मदत होईल, असा विश्वासही मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी डीएफसीसीआयएलचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीण कुमार यांनी पश्चिम समर्पित मालवाहतूक मार्गिकेच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये, बांधकामादरम्यान आलेली अभियांत्रिकी आव्हाने, मार्गिकेची क्षमता तसेच जेएनपीटीशी जोडणीमुळे मालवाहतुकीला मिळणारी गती याबाबत माहिती दिली. तर जपानच्या मुंबईस्थित वाणिज्य दूतावासाच्या महावाणिज्यदूत श्रीमती सातो हितोमी यांनी प्रकल्पाच्या उभारणीत भारत-जपान सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले.
00000000

WhatsApp