साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची संकल्पना आजच्या संविधानात अंतर्भूत – पालकमंत्री शंभूराज देसाई – महासंवाद

    - Advertisement -




    सातारा, दि. २६: साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य म्हणजेच स्वराज्य स्थापन केले. यामध्ये सर्वसामान्य प्रजेचे हित जपले होते. सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा विचार त्यामध्ये होता. त्याचेच प्रतिबिंब आजच्या संविधानात अंतर्भूत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

    युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या नामांकनात समाविष्ट असलेल्या सातारा जिल्ह्यातील ऐतिहासिक किल्ले प्रतापगडावर संविधान दिनानिमित्त ‘गडाचा मान, संविधानाचा सन्मान’ हा कार्यक्रम पालकमंत्री देसाई यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, उपवन संरक्षक अमोल सातपुते, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अमोल सातपुते आणि नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    पालकमंत्री देसाई यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि संविधान यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले.

    राज्यात प्रथमच अशा स्वरूपाचा कार्यक्रम होत असल्याचे सांगून पालकमंत्री देसाई म्हणाले, राज्यातील ११ किल्ल्यांवर असा कार्यक्रम होत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून समानता आणि समतेचा विचार दिला तर छत्रपती शिवाजी महाराजांनी याच तत्त्वावर स्वराज्य उभारले. या दोन्ही महामानवांच्या विचारांचा एकत्र जागर या कार्यक्रमाच्या माध्यमातून होत आहे. त्याला नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. सर्वच नागरिकांनी संविधानाचे पावित्र्य जपण्याचे काम करावे, असे आवाहनही पालकमंत्री देसाई यांनी केले.

    यावेळी गड संवर्धनासाठी स्वच्छता मोहीम ही राबवण्यात आली. तसेच शाहिर सुरेश जाधव यांचे पोवाडा सादरीकरण झाले.

    ०००००







    - Advertisement -