नाशिक, दि. ८ (जिमाका वृत्तसेवा) : नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नियोजित कामे सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळेत पूर्ण करावीत. त्यासाठी महसूल विभागाने भूसंपादनाच्या प्रक्रियेला गती द्यावी, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभाग व वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांनी दिले.
नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ‘भूसंपादन- सद्य:स्थिती व अपेक्षित मार्गदर्शन’ याविषयावर जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आज सकाळी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अपर मुख्य सचिव श्री. म्हैसकर अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, उपवनसंरक्षक सिद्धेश सावर्डेकर, राकेश सेपट, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय सल्लागार ब्रजेश दीक्षित, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता देवेंद्र पवार, उपविभागीय अधिकारी अर्पिता ठुबे (नाशिक), डॉ. पवन दत्ता (इगतपुरी), कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे यांच्यासह महसूल, वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते.

अपर मुख्य सचिव श्री. म्हैसकर म्हणाले की, राज्य शासनाच्यावतीने सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून विविध पायाभूत सोयीसुविधांची कामे सुरू आहेत. ही सर्व कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करतानाच वेळेत पूर्ण होतील, असे नियोजन करावे. त्यासाठी सर्व विभागांनी सांघिक भावनेने काम करावे. नाशिक परिक्रमा मार्गासह भूसंपादनाच्या सर्व कामांना नियमांना अधीन राहत गती द्यावी.
यावेळी अपर मुख्य सचिव श्री. म्हैसकर यांनी ऊर्जा विभाग, रेल्वे स्थानकांचा विकास, साधूग्राम, वाहनतळ, नाशिक परिक्रमा मार्ग, वृक्ष तोडीचे प्रस्ताव, वनसंवर्धन आदी विभागांचा आढावा घेतला. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनीही सविस्तर मार्गदर्शन केले.
जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी सांगितले की, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भूसंपादनाचे २२ प्रस्ताव आहेत. त्यात रेल्वे स्थानके, राष्ट्रीय महामार्ग, पाटबंधारे विभाग, त्र्यंबक नगरपरिषद, नाशिक महानगरपालिकेसह नाशिक परिक्रमा मार्गासाठी भूसंपादनाचे प्रस्ताव आहेत. त्यापैकी बहुतांश प्रस्तावांचा अंतिम निवाडा होऊन जागेचा ताबा देण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित कामांना गती आली आहे. उर्वरित कामांना गती देत ती कुंभमेळ्यापूर्वी पूर्ण करण्यात येतील, असेही त्यांनी बैठकीत सांगितले.













