सेवा संकल्प अभियानातून स्वच्छता आणि आरोग्य जनजागृतीला गती – महासंवाद

    - Advertisement -

    मुंबई, दि.१ : स्वच्छ, निरोगी आणि जागरूक मुंबईसाठी मुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. ‘स्वच्छता हीच सेवा’ या उपक्रमासोबतच नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती, पोषण व ॲनिमिया तपासणी आणि महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी विविध उपक्रमांना गती देण्यात आली आहे.

    बाबुगेनू सेक्शनअंतर्गत वर्धमान चौक येथे 1 ऑक्टोबर रोजी ‘स्वच्छता हीच सेवा’ उपक्रमांतर्गत सखोल स्वच्छता करण्यात आली. यावेळी परिसराची स्वच्छता करून नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत जनजागृती करण्यात आली. तसेच कुंभारवाडा सेक्शनअंतर्गत कुंभारवाडा ड्राय वेस्ट सेंटर येथेही सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. नागरिकांना कचऱ्याचे योग्य वर्गीकरण, स्वच्छ परिसर आणि स्वच्छतेच्या सवयींबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

    ‘सेवा माझे योगदान’अंतर्गत पोषण आणि ॲनिमिया जागरूकता उपक्रमालाही विशेष महत्त्व देण्यात आले आहे. सर्व अंगणवाडी केंद्रांवर ‘उत्सव’ सुरू असून हा उपक्रम ८ ऑक्टोबर २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे. आतापर्यंत १३२ किशोरवयीन मुली आणि ७६ गर्भवती व स्तनदा मातांची ॲनिमिया तपासणी करण्यात आली आहे. स्वच्छता, आरोग्य तपासणी, महिलांची रक्त तपासणी, पोषण व ॲनिमियाबाबत जनजागृती अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून ‘सेवा संकल्प अभियान’ नागरिकांच्या आरोग्यपूर्ण आणि स्वच्छ जीवनशैलीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देत आहे.

    000

    धोंडिराम अर्जुन/विसंअ

    - Advertisement -