स्पेसफेस्टच्या माध्यमातून विज्ञान, अवकाश आणि मनोरंजनाचा त्रिवेणी संगम – मंत्री डॉ. उदय सामंत

- Advertisement -


मुंबई, दि. २५ : विज्ञान, अवकाश आणि मनोरंजन यांचा त्रिवेणी संगम घडविणाऱ्या ‘स्पेसफेस्ट’च्या माध्यमातून महाराष्ट्राला अवकाश क्षेत्रातील उद्योगांचे जागतिक केंद्र बनविण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी सांगितले.

नव्या पिढीतील मनोरंजन, गेमिंग आणि ई-स्पोर्ट्स क्षेत्रातील जागतिक आघाडीची कंपनी नोडविन गेमिंग कंपनी आणि महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने आयोजित करण्यात येणारा स्पेसफेस्ट’ या भारतातील अंतराळ, विज्ञान, नवकल्पना आणि अंतराळावर आधारित पॉप कल्चरला समर्पित पहिल्या कार्यक्रमाची घोषणा उद्योगमंत्री डॉ.सामंत यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अनबळगन, एमआयडीसी सीईओ दीपेंद्र सिंह कुशवाह, प्रायमस पार्टनर्स इंडियाच्या सह-संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक आरती हरभजनका आणि नोडविन गेमिंगचे सह-संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक अक्षत राठी उपस्थित होते.

‘स्पेसफेस्ट’ हा केवळ मनोरंजनाचा कार्यक्रम नसून महाराष्ट्रातील विद्यार्थी, तरुण आणि नवउद्योजकांना अवकाश क्षेत्रातील नव्या संधींची ओळख करून देणारा महत्वपूर्ण उपक्रम आहे. या माध्यमातून भविष्यातील रोजगार आणि उद्योगांच्या संधी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे मंत्री डॉ.सामंत यांनी सांगितले.

चंद्रयान मोहिमेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक लघु व मध्यम उद्योगांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. विशेषतः पुणे जिल्ह्यातील अनेक उद्योगांनी चंद्रयानासाठी आवश्यक भाग तयार केले होते. अवकाश क्षेत्राशी संबंधित या विविध उद्योगांना एका छत्राखाली आणून महाराष्ट्राची क्षमता जगासमोर मांडण्याचा प्रयत्न ‘स्पेसफेस्ट’च्या माध्यमातून केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अवकाश क्षेत्र हे केवळ संशोधनापुरते मर्यादित नसून त्यातून मोठ्या प्रमाणात उद्योग आणि रोजगारनिर्मितीची क्षमता आहे. विमानाचे सुटे भाग, उपग्रहांचे घटक, संरक्षण क्षेत्रातील तंत्रज्ञान तसेच अन्य आधुनिक उद्योग यामध्ये मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. या संधींचा लाभ महाराष्ट्रातील तरुण आणि उद्योजकांना मिळवून देण्यासाठी उद्योग विभाग प्रयत्नशील असल्याचे डॉ. सामंत यांनी स्पष्ट केले.

अवकाश क्षेत्राला चालना देण्यासाठी महाराष्ट्रात आवश्यक पायाभूत सुविधा आणि औद्योगिक भूखंड उपलब्ध करून देण्यात येतील, असे सांगून मंत्री डॉ.सामंत म्हणाले की, संरक्षण क्षेत्रासाठी शिर्डी, रत्नागिरी आणि अन्य ठिकाणी हब व क्लस्टर विकसित करण्याचे काम सुरू आहे. अवकाश आणि संरक्षण क्षेत्रातील उद्योगांना जागेची कमतरता भासू नये यासाठी एमआयडीसीच्या माध्यमातून आवश्यक सहकार्य केले जाईल, अशी ग्वाहीही डॉ. सामंत यांनी दिली.

आजच्या पिढीच्या रोजगार आणि उद्योगविषयक अपेक्षा बदलत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणाबरोबरच आधुनिक तंत्रज्ञान, अवकाश, गेमिंग आणि नव्या उद्योगक्षेत्रातील संधींची माहिती मिळणे आवश्यक आहे. ‘स्पेसफेस्ट’ हा या बदलत्या गरजा लक्षात घेऊन आयोजित करण्यात येणारा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरेल, असेही त्यांनी सांगितले. अवकाश क्षेत्रातील उद्योगांमध्ये गुंतवणूक, परकीय गुंतवणूक आणि रोजगारनिर्मिती महाराष्ट्रात आणण्यासाठी उद्योग विभाग कटिबद्ध आहे. ‘स्पेसफेस्ट’च्या माध्यमातून करण्यात आलेल्या घोषणा निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल. महाराष्ट्राला अवकाश क्षेत्रातील उद्योगांचे अग्रगण्य केंद्र बनविण्याचा आमचा प्रयत्न असून, त्यासाठी नोडविन गेमिंगसह सर्व संबंधित घटकांना राज्य सरकारकडून पूर्ण सहकार्य दिले जाईल, अशी ग्वाही उद्योगमंत्र्यांनी दिली.

स्पेस टेक क्षेत्रातील संपूर्ण मूल्यसाखळी महाराष्ट्रात विकसित करणार डॉ. पी. अनबळगन 

स्पेस टेक क्षेत्रात केवळ प्रक्षेपणावर न थांबता प्रगत उत्पादन, रोबोटिक्स, संशोधन, अभियांत्रिकी आणि संपूर्ण मूल्यसाखळी महाराष्ट्रात विकसित करण्यावर शासनाचा भर आहे, असे उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अनबळगन यांनी सांगितले. डॉ. अनबळगन म्हणाले की, देशातील एअरोस्पेस व डिफेन्स आणि नेव्हिगेशन प्रणालीतील सुमारे २५ टक्के उत्पादन महाराष्ट्रात होते. तसेच इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक घटकांच्या उत्पादनातही महाराष्ट्राचे मोठे योगदान आहे. संरक्षण, अणुतंत्रज्ञान, एअरोस्पेस आणि स्पेस टेक्नॉलॉजीचा समावेश असलेली ‘डीएनए’ धोरणाची आखणी करण्यात येत असून, ते लवकरच जाहीर करण्यात येईल.

भारतातील स्पेस टेक क्षेत्राची सध्याची सुमारे ८.५ ते ९ अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था २०३२-३३ पर्यंत ४५ ते ५० अब्ज डॉलर आणि २०४० पर्यंत १०० अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. या वाढीत महाराष्ट्राने महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी सरकार, उद्योग, शैक्षणिक संस्था, संशोधन संस्था आणि गुंतवणूकदार यांना एकत्र आणले जात आहे.

पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथे प्रगत उत्पादन व प्रिसिजन इंजिनीअरिंगची क्षमता विकसित केली जाणार असून, संरक्षण व एअरोस्पेस क्षेत्रासाठी प्रगत उत्पादन प्रणाली उभारण्यात येणार आहेत. नांदेड, नागपूर आणि मिहान येथे हेलिकॉप्टर व विमान निर्मितीच्या संधी निर्माण होत असून, महाराष्ट्रातील एअरोस्पेस परिसंस्थेला मोठी चालना मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले. स्पेसफेस्ट हा केवळ तीन दिवसांचा कार्यक्रम नसून, महाराष्ट्रातील स्पेस टेक क्षेत्रातील सहकार्याची आणि नव्या युगाच्या विकासाची सुरुवात आहे. विद्यार्थ्यांपासून संशोधकांपर्यंत नव्या पिढीला स्पेस टेक, विज्ञान व संशोधन क्षेत्राकडे आकर्षित करून त्यांना योग्य संधी उपलब्ध करून देणे ही शासनाची जबाबदारी असल्याचे डॉ. अनबळगन यांनी सांगितले.

स्पेस क्षेत्रातील स्टार्टअप्ससाठी विशेष परिसंस्था उभारणार दीपेंद्रसिंह कुशवाह 

अंतराळ क्षेत्रातील स्टार्टअप्सना आवश्यक पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान, मार्गदर्शन व चाचणी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्रात विशेष परिसंस्था उभारण्यात येत आहे, अशी माहिती एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशवाह यांनी दिली. राज्यातील ‘मॅट्रिक्स’ योजनेंतर्गत सुमारे २०० इनक्युबेशन केंद्रे उभारण्यात येणार असून, या केंद्रांमध्ये को-वर्किंग स्पेस, प्रयोगशाळा, चाचणी, प्रमाणन, एआय व मार्गदर्शन सुविधा बाजारभावापेक्षा ७५ ते ८० टक्के सवलतीत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. अंतराळ क्षेत्रातील स्टार्टअप्सना यामध्ये सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल.

मुंबई, पुणे, नागपूर व नाशिक येथे सुमारे १५ लाख चौरस फूट क्षेत्रात ही केंद्रे विकसित केली जाणार आहेत. आयआयटी मुंबई, आयआयएम नागपूर, व्हीजेटीआय आणि सीईओपीसह पहिल्या टप्प्यातील सुमारे १२ केंद्रांचे काम सुरू झाले असून, ती लवकरच कार्यान्वित होतील. अंतराळ क्षेत्रासाठी आवश्यक विशेष पायाभूत सुविधा व धोरणात्मक सहकार्य देण्यासाठी राज्य शासन आणि एमआयडीसी कटिबद्ध असल्याचे कुशवाह यांनी सांगितले.

0000

संजय ओरके/विसंअ



Source link

- Advertisement -