बोरघर / माणगांव:( विश्वास गायकवाड ) गुरुवार दिनांक ०२ जानेवारी रोजी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून महाडच्या दिशेने पेंढा घेऊन जाणार्या टेम्पोला भर दुपारी माणगांव बाजारपेठेत अचानक आग लागली. त्यामुळे माणगांव शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर एकच हाहाकार झाला. याच वेळेस सदर महामार्गावर वाहतूक नियंत्रण कर्तव्यावर असलेले कर्तव्य दक्ष वाहतूक पोलीस विशाल येलवे आणि त्यांचे सहकारी सागर मदने, पांडुरंग धायगुडे आणि बिट मार्शल अादिनाथ दहिफळे इत्यादी वाहतूक पोलीस आणि माणगांव मधील परोपकारी नागरिक यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता प्रसंगावधान राखून तात्काळ त्या टेम्पोला लागलेली आग मोठ्या शिताफीने आटोक्यात आणली त्यामुळे या ठिकाणी होणारा पुढील संभाव्य धोका टळला.
त्यामुळे माणगांव शहर आणि बाजारपेठेतील सर्व नागरिक आणि व्यापारी यांच्या कडून या सर्व जांबाज कर्तव्यदक्ष वाहतूक पोलिसांचे आभार व्यक्त करण्यात आले. सदर घटनेची सविस्तर हकीकत अशी की, टाटा मेक्सिमो टेम्पो चालक रुपेश पवार आमडोशी ही व्यक्ती त्याच्या ताब्यातील टाटा मेक्सिमो टेम्पो पेंढ्याने भरलेल्या स्थितीत माणगांव मधून ढालघर च्या दिशेने जात असताना सदरची घटना गुरुवार दिनांक ०२ जानेवारी २०२० रोजी भर दुपारी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर माणगांव बाजारपेठेतील मेट्रो मिष्टान्न आणि कमल फर्निचर व बिकानेर स्वीट्स या दुकानांच्या समोर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर घडली. सदर पेंढ्याच्या टेम्पोला लागलेली आग नेमक्या कोणत्या कारणामुळे लागली हे अद्याप कोणालाही समजलेले नाही. मात्र माणगांव मधील कर्तव्य दक्ष वाहतूक पोलीस यांच्या सतर्कतेमुळे सदर घटनेच्या माध्यमातून निर्माण होणारा संभाव्य धोका पुर्ण पणे टळला त्यामुळे सर्व नागरिकांनी माणगांव वाहतूक पोलिसांचे कौतुक करून आभार व्यक्त केले.