नवी मुंबई, दि.7 : ग्रामीण महिलांच्या उन्नतीसाठी उमेद अभियानाची वचनबद्धता टिकविण्यासाठी जिल्हास्तरावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी संवेदनशीलता दाखविणे अपरिहार्य आहे. येणाऱ्या आर्थिक वर्षात महाराष्ट्र स्वयं सहाय्यता गटाच्या महिलांच्या उपजीविका विषयात देशातील सर्वोत्कृष्ट राज्य असणार असा विश्वास उमेदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.हेमंत वसेकर यांनी व्यक्त केला. नवदृष्टी आणि उपजीविका वर्ष अंमलबजावणीबाबत आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कार्यशाळेत ते उद्घाटक म्हणून बोलत होते.
राज्यातील सर्व ग्रामीण जिल्ह्यांचे जिल्हा अभियान व्यवस्थापक आणि जिल्हा व्यवस्थापक यांच्यासाठी आजपासून तीन दिवसांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी डॉ.वसेकर म्हणाले, सर्व यंत्रणेला ग्रामीण महिलांच्या उन्नतीसाठी काम करत असताना संवेदनशीलता दाखविणे अत्यावश्यक आहे. यासाठी सर्वांनी मरगळ झटकून नव्या आर्थिक वर्षात ‘महाजीविका अभियानाची’ जबाबदारीने आणि पूर्ण नियोजन करून अत्यावश्यक असल्याचे डॉ.वसेकर यांनी सांगितले.
अतिरिक्त संचालक परमेश्वर राऊत म्हणाले, अभियानाचे काम करून समाजाप्रती असलेले ऋण फेडण्याची एक चांगली संधी आहे. आर्थिक वर्ष हे अभियानाकरिता अतिशय महत्वाचे वर्ष असेल, या वर्षात आपण स्वयं सहाय्यता गटाच्या महिलांना सक्षम बनविण्यासाठी उपजीविका अभियानाची मोहीम सुरू केली आहे. अभियानाच्या प्रती सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी समर्पणाची भावना दाखविण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या तीन दिवसीय कार्यशाळेबाबतची माहिती अवर सचिव धनवंत माळी यांनी दिली तर अभियानाच्या उपसंचालक श्रीमती शीतल कदम यांनी आभार व्यक्त केले.
0000