सांगली, दि. १५: स्वातंत्र्य म्हणजे सामाजिक न्याय, समान संधी, लोकशाही मूल्ये आणि सर्वसमावेशक विकासाचा संकल्प असून, या अनुषंगाने विकसित सांगली जिल्हा २०४७ चा विकास आराखडा केला आहे. येत्या चार वर्षांत जिल्ह्याचा जीडीपी पावणेदोन लाख कोटी करण्याचे उद्दिष्ट आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले.
भारताच्या 80 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर दिलेल्या शुभेच्छा संदेशात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संगिता पाटील, पद्मश्री डॉ. विजयकुमार शहा, आमदार सुधीर गाडगीळ, महापौर धीरज सूर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, महानगरपालिका आयुक्त संजिता महापात्र, उपमहापौर गजाजन मगदूम, अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, अतिरीक्त आयुक्त राहुल रोकडे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, पालकमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव यांच्यासह विविध कार्यालय प्रमुख, स्वातंत्र्य सैनिक, वीरमाता, वीरपत्नी, नागरिक उपस्थित होते.

भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, गतवर्षीच्या एक हजार कोटींच्या वार्षिक कृती आराखड्यापैकी जवळपास ९०० कोटींची उद्दिष्टपूर्ती झाली आहे. या विकास आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी केलेल्या जिल्ह्यांमध्ये सांगली जिल्ह्याचा समावेश झाला असून 16 कोटींचा प्रोत्साहन निधी कालच मंजूर झाला आहे. त्यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील आणि यंत्रणांचे अभिनंदन केले.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, जिल्हा वार्षिक योजनेतून यावर्षी 676 कोटी 29 लाख रूपये मंजूर आहेत. यातून आतापर्यंत शासकीय औषध खरेदीसाठी आणि शल्य साहित्य खरेदीसाठी प्रत्येकी पाच कोटी, वृक्ष लागवडीसाठी साडेतीन कोटी रूपये, पोलीस दलाला 27 वाहनांसाठी सव्वा तीन कोटी रूपये, जनावरांच्या औषधासाठी दोन कोटी रूपये, दूध उत्पादन वाढीसाठी चार कोटींच्या कामास मान्यता दिली आहे. तसेच, राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या यादीतील 21 हजार 725 शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीपोटी 156.54 कोटी जमा केले आहेत, असे त्यांनी सांगितले.

कृषि विभागाच्या प्रगतीचा आढावा घेताना पालकमंत्री पाटील म्हणाले, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २३ व्या हप्त्यापोटी जिल्ह्यातील एकूण ३ लाख ८३ हजारहून अधिक लाभार्थींच्या खात्यात ७६ कोटी, ७१ लाख इतकी रक्कम थेट जमा करण्यात आली. याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून आजअखेरीस 8 हप्त्यांपोटी ६१३ कोटी अनुदान देण्यात आल्याचे सांगून, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानामध्ये 65 हजारहून जास्त लाभांचे वाटप केले आहे, असे सांगितले.
विविध विभागांच्या कामगिरीचा आढावा घेताना त्यांनी शेतकऱ्यांना वीजपुरवठा, शासकीय आरोग्य सेवांचे बळकटीकरण, घरकुले, महिला सक्षमीकरण, सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना, महापालिकेच्या यशस्वी कामे आदींचा विशेष उल्लेख केला. तसेच, विविध क्षेत्रात यशस्वी कामगिरी केलेल्या शासकीय यंत्रणा व शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा परिषद शाळांच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला.

प्रारंभी पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व राष्ट्रध्वजास सलामी देण्यात आली. त्यानंतर राष्ट्रगीत व राज्यगीत वादन करण्यात आले. यावेळी तंबाखूमुक्ती व पॉश कायद्याची शपथ उपस्थितांना देण्यात आली. त्यानंतर पालकमंत्री पाटील यांनी ई-ऑफिस प्रणालीतील यशाबद्दल जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स पुरस्काराबद्दल जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, महापालिका आयुक्त संजिता महापात्र व पोलीस विभागाच्या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांचे व त्यांच्या टीमचे अभिनंदन करून सत्कार केला.
यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थ्यांना पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. कार्यक्रमानंतर त्यांनी उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, पदाधिकारी, अधिकारी, ज्येष्ठ नागरिक यांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास विविध मान्यवर, शासकीय अधिकारी, कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, पत्रकार आदि उपस्थित होते. राष्ट्रीय गीत व राज्यगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. सूत्रसंचालन विजय कडणे यांनी केले.
पालकमंत्री पाटील यांच्याहस्ते गुणगौरव –
जिल्हा सैनिक कल्याण विभाग – ऑपरेशन स्नो लेओपार्ड, जिल्हा तवांग, अरूणाचल प्रदेश येथे नियंत्रण रेषेजवळ भूस्खलन झाल्यामुळे अपंगत्व आल्याने मुख्यमंत्री महोदयांकडून ताम्रपटप्राप्त शॅपर रोहीत रामराव पाटील (मु. पो. अंजनी, ता. तासगाव), जम्मू काश्मिर येथील नियंत्रण रेषेजवळील ट्रेनिंग कँपमध्ये विमानातून उडी मारताना गंभीर जखमा होऊन अपंगत्व आल्याने मुख्यमंत्री महोदयांकडून ताम्रपटप्राप्त हवालदार भैराप्पा यशवंत लंगोटे (मु. पो. जिरग्याळ, ता. जत)
यावेळी पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल पालकमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव आणि पालकमंत्री संपर्क प्रमुख तातोबा मुरलीधर नायकवडी यांचा सन्मान केला.
जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभाग – कडेपूर (ता. कडेगाव) या ग्रामपंचायतीने राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स पुरस्कार-2026 मिळवल्याबद्दल उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत विभाग), शशिकांत शिंदे, गटविकास अधिकारी प्रशांत जगन्नाथ राऊत, ग्रामपंचायत कडेपूरचे सरपंच सतिश देशमुख, विस्तार अधिकारी (कृषि) श्रीधर कुलकर्णी, सुनिल लोहार, ग्रामपंचायत लिपिक कुलदीप दिनेश माने.
जिल्हा उद्योग केंद्र – उद्योग संचालनालय, मुंबई यांचे मार्फत जिल्हा पातळीवर जिल्हा उद्योग केंद्रामार्फत उत्कृष्ट कामगिरी केलेले लघु उद्योजक – सन २०२४-२५ – भाग्यश्री सर्जिकल्स, विटा (प्रथम क्रमांक), आयडीयल इंडस्ट्रीज, MIDC, कुपवाड (द्वितीय क्रमांक), सन २०२५-२६ – आनंद एंटरप्राईजेस, पलूस, (प्रथम क्रमांक), नेहा इंजिटेक सोल्युशन्स प्रा.लि. सावळी (द्वितीय क्रमांक)
कृषी विभाग – विविध घटकांतर्गत उत्कष्ट काम केलेले अधिकारी – उदय माळी, यु. एस. साळे, उमेश मोहिते, व्ही. के. राठोड, अमितकुमार सूर्यवंशी, सचिन दाभोळे.
जिल्हा परिषद शिक्षण विभाग – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या ५ वी आणि ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत झळकलेल्या २२ तसेच, 4 वी आणि 7 वी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत झळकलेल्या 31 गुणवंत विद्यार्थी
पोलीस विभाग – माहे जुलै २०२६ मध्ये सांगली जिल्हा पोलीस दलाच्या ‘डायल ११२’ कक्षाने प्राप्त झालेल्या ३,३४१ कॉल्सवर तत्काळ आणि प्रभावी कारवाई करत सर्व कॉल्सचा यशस्वी निपटारा करत सांगली जिल्हा पोलीस दलाने संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. त्याबद्दल पोलीस निरीक्षक बयाजीराव शंकर कुरळे व इतर १६ जण.
सांगलीच्या उमदी पोलीस ठाण्याने बलात्कार आणि हत्येसारख्या गंभीर गुन्ह्याचा अत्यंत चाणाक्षपणे तपास करून, वेळेत भक्कम दोषारोपपत्र दाखल केले. त्यांच्या याच उत्कृष्ट कामगिरीमुळे आरोपींना फाशी आणि जन्मठेपेची कठोर शिक्षा झाली. याबद्दल – जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल साळुंखे व १० जण.
विटा पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एका गंभीर खून प्रकरणाचा अत्यंत कौशल्याने व जलदमगतीने तपास करून मा. न्यायालयात भक्कम पुरावे सादर केले. पोलीस प्रशासनाच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळेच न्यायालयाकडून आरोपीला ‘मरेपर्यंत फाशीची’ कडक शिक्षा सुनावण्यात आली आहे. याबद्दल – सपोनि मुद्दस्सर शेख व इतर 7 जण. गडचिरोली व गोंदिया सारख्या नक्षलग्रस्त भागात खडतर सेवा बजावून उत्कृष्ट कामगिरी बजावलेले विशेष सेवा पदकाने सन्मानित – पोलीस निरीक्षक किरण रासकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजाता भोपळे, पोलीस उपनिरीक्षक राजीव केंद्रे, पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग मुंडे, पोलीस उपनिरीक्षक संतोष यादव.
केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक प्राप्त – किरण वसंतराव चौगुले, संजीवकुमार दत्तात्रय झाडे, संदीप रंगराव शिंदे. आदिशक्ती अभियानांतर्गत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या ग्रामपंचायती – ग्रामपंचायत येडेनिपाणी, कवठेपिरान व अंबक.
आरोग्य विभाग – तंबाखूमुक्त शाळा या पायलट प्रोजेक्ट अंतर्गत विहित निकष पूर्ण केलेल्या शाळा – जिल्हा परिषद शाळा मानमोडी व सांबरवाडी विविध सामाजिक क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल डॉ. दीपक येरटे, मृद व जैव इंधन तज्ज्ञ तथा मास्टर ट्रेनर डॉ. तुषार शिवशरण.
००००









WhatsApp