मुंबई, दि २९ : एक कलाकार म्हणून अभिनयाचा दर्जा प्रत्येक सिनेमात वाढवणाऱ्या इरफान खान यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीने ‘हरहुन्नरी‘ अभिनेता गमावला असल्याची भावना सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केली.
अमित देशमुख आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, इरफान खान याच्या डोळ्यातील चमक, सहज अभिनय, पडद्यावरचा सुदंर वावर यामुळेच त्यांनी प्रत्येक सिनेमात आपल्या अभिनयाची छाप पाडली. टी.व्ही पासून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या इरफान यांनी दरवेळी वेगवेगळे सिनेमे निवडले. जागतिक सिनेमातही इरफान यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन आणि प्रबोधन एकाचवेळी केले. त्यांच्या दर्जेदार अभिनयाकरिता भारत सरकारने त्यांना पद्मश्री देऊन गौरविले होते. इरफान यांनी दोन वर्षे कर्करोगाशी झुंज दिली,परंतु ही झुंज अयशस्वी ठरली. इरफान यांच्या निधनाने सिनेसृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे.