हायलाइट्स:
- ‘जय भवानी जय शिवाजी’ मालिका लवकरच येतेय प्रेक्षकांच्या भेटीला
- छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिलेदारांची शौर्यगाथा या मालिकेच्या रुपात उलगडणार
- अभिनेता अजिंक्य देव या मालिकेतून करतायत छोट्या पडद्यावर पुनरागमन
अजिंक्य देव आपल्या भूमिकेविषयी सांगतात, ‘माझ्या करिअरची सुरुवातच ‘सर्जा’ चित्रपटातील ऐतिहासिक व्यक्तिरेखेने झाली होती. त्यामुळे बाजीप्रभू साकारताना प्रचंड आनंद होत आहे. बाजीप्रभूंच्या शौर्याच्या कथा आपण ऐकल्या आहेत, वाचल्या आहेत. पावनखिंडीमध्ये जीवाची बाजी लावत ते शेवटच्या श्वासापर्यंत लढले. अश्या या शुरवीराची भूमिका साकारायला मिळणं हे माझ्यासाठी नवं आव्हान असणार आहे. या भूमिकेसाठीचा लूकही माझ्यासाठी नवा आहे.’
अजिंक्य देव पुढे सांगतात, ‘फिटनेसच्या बाबतीच मी नेहमीच जागरुक असतो. व्यायाम आणि खाण्यावरचं नियंत्रण यामुळेच मी फिट आहे. मी दररोज पाच ते सहा किलोमीटर धावतो. उत्तम आरोग्यासाठी हे सर्व गरजेचं आहे असं मला वाटतं. या सगळ्याचा उपयोग मला जय भवानी जय शिवाजी मालिकेत बाजीप्रभू साकारताना होतो आहे. स्टार प्रवाह सध्याची नंबर वन वाहिनी आहे. याआधी ‘प्रेमा तुझा रंग कसा’ या कार्यक्रमाच्या काही भागांचं मी सूत्रसंचालन केलं होतं. त्यामुळे पुन्हा एकदा स्टार प्रवाहसोबत या मालिकेच्या निमित्ताने काम करण्याचा योग आला आहे.’
स्टार प्रवाह प्रस्तुत ‘जय भवानी जय शिवाजी’ या मालिकेची निर्मिती दशमी क्रिएशन्सची असून २६ जुलैपासून रात्री १० वाजता छत्रपती शिवरायांच्या शिलेदारांची ही गोष्ट भेटीला येणार आहे.