मुंबई, दि. २८ :- बीड जिल्ह्यातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, हिवरापहाडी (केंद्र जरूड) ता. बीड येथील चिमुकल्या विद्यार्थिनींच्या ‘बॉटल माईक’ सोशल मीडिया रिपोर्टिंगची अखेर उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी तातडीने दखल घेतली आहे. “आम्हाला अधिकारी व्हायचंय, तुम्ही फक्त शिक्षक द्या…” अशी हाक मारणाऱ्या या मुलींना त्यांनी तातडीने प्रतिसाद दिला.
उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर बीड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय आणि शिक्षण विभाग तात्काळ ॲक्शन मोडमध्ये आला. वरिष्ठांच्या आदेशानुसार शिक्षक शिवाजी जोगदंड यांची हिवरापहाडी शाळेत नियुक्ती करण्यात आली.
विद्यार्थिनींच्या आंदोलनाची दखल
हिवरापहाडी येथील दुर्गम भागातील शाळेत गेल्या काही दिवसांपासून गणित, विज्ञान आणि संगणक यांसारख्या महत्त्वाच्या विषयांसाठी शिक्षक उपलब्ध नव्हते. यावर तोडगा काढण्यासाठी येथील चिमुकल्या मुलींनी पाणी पिण्याच्या प्लास्टिक बॉटलचा माईक बनवून थेट वर्गातूनच अभिरुप बातमीपत्र सादर केले होते. हा भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओची गांभीर्याने दखल घेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी बीड जिल्हा प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
प्रशासनाकडून शिक्षक रुजू
वरिष्ठ स्तरावरून थेट आदेश झाल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने तात्काळ पावले उचलत शिक्षक शिवाजी जोगदंड यांची हिवरापहाडी शाळेत नियुक्ती करण्याचा आदेश जारी करण्यात आला असून त्या आदेशानुसार ते हिवरापहाडी शाळेत रुजू झाले आहेत.

WhatsApp