हायलाइट्स:
- शाहरुखच्या सिनेकारकिर्दीला २९ वर्षे पूर्ण
- सोशल मीडियावर शाहरुखने साधला चाहत्यांशी संवाद
- चाहत्यांनी शाहरुखला विचारले असंख्य प्रश्न
‘द फॅमिली मॅन २ मधील इंटिमेट सीन्स कापले’, शहाब अलीचा खुलासा
शाहरुख खानला फिल्म इंडस्ट्रीमध्ये येऊन २९ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने सोशल मीडियावर #29GoldenYearsOfSRK आणि 29YearsOfDeewana हे ट्रेंड सुरू आहेत. हा ट्रेंड सुरू झाल्यामुळे शाहरुखने त्याच्या चाहत्यांचे मनापासून आभार मानले आहेत. त्याने लिहिले की, ‘ काम करत होतो त्यामुळे सकाळपासून केलेल्या पोस्ट मी आता पाहत आहे. या इंडस्ट्रीमध्ये येऊन मला आता ३० वर्षे पूर्ण झाली आहेत. इतके वर्षे तुम्ही माझ्यावर भरभरून प्रेम करत आहात त्याबद्दल तुमचे आभार.’ त्यानंतर शाहरुखने त्याच्या चाहत्यांशी ट्विटवरून#ASKSRK या हॅशटॅगखाली संवाद साधला. यावेळी त्याच्या चाहत्यांनी खूप सारे प्रश्न विचारले… काहींनी शाहरुखच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल विचारले तर काहींनी स्वतःच्या अडचणी सांगत शाहरुखकडून सल्लादेखील मागितला.
अशी होती प्रश्न उत्तरे
शाहरुखने आपल्या चाहत्यांशी संवाद साधला. त्यामध्ये शाहरुखने युझर्सनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. एका युझरने शाहरुखला त्याची तब्येत कशी आहे, असा प्रश्न विचारला. त्यावर शाहरुखने उत्तर दिले, ‘जॉन अब्राहमसारखी उत्तम नाही, परंतु मी माझी उत्तम काळजी घेत आहे.’
तर एका युझरने त्याला विचारले की सध्या लॉकडाऊनमुळे खूप वेळ आहे. तर मी कोणते पुस्तक वाचू तुम्ही सांगा. त्यावर शाहरुखने उत्तर दिले, ‘ हॅरी पॉटरची सीरिज पुन्हा एकदा वाच.’ त्याशिवाय शाहरुखने एका चाहत्याला सकारात्मक राहण्याचा सल्लाही दिला आहे.
तर एका युझरने शाहरुखला विचारले की, अगदी १५ मिनिटांपूर्वीच माझे ब्रेकअप झाले आहे. आता यातून मी बाहेर कसा पडू आणि आयुष्य पुन्हा नव्याने जगू… त्यावर शाहरुखने आपल्या या चाहत्याला उत्तर दिले, ‘तुम्ही तिला कधीही विसरू शकत नाही. तिला आपल्या आठवणींमध्ये ठेवा आणि आपल्या दुःखापासून शिका. पुढे जाऊन तेच तुम्हाला अधिक ताकदवान बनवणार आहेत.’
दरम्यान, एका चाहत्याने तर शाहरुखला ‘तुम्ही देखील आमच्यासारखे बेरोजगार झाला आहात का…’ असा भन्नाट प्रश्न विचारला. त्यावर शाहरुखने देखील त्याच्या अंदाजात उत्तर दिले, तो म्हणाला, ‘ जो कुछ नहीं करते वे कमाल करते है..’
शाहरुखने दिलेल्या या उत्तरावर चाहत्यांनी त्याचे भरभरून कौतुक केले.
दरम्यान, शाहरुखच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचे तर त्याचे अनेक सिनेमे लवकरच प्रदर्शित होणार आहेत. त्याचप्रमाणे त्याच्या स्वतःच्या रेड चिलीज प्रॉडक्शनतर्फे देखील सिनेमांची निर्मितीवर काम सुरू आहे. शाहरुख लवकरच पठाण सिनेमात दिसणार आहे. यशराज प्रॉडक्शनची निर्मिती असलेल्या या सिनेमात शाहरुख सोबत दीपिका पदुकोण, ऋतिक रोशन आणि जॉन अब्राहम देखील आहेत.