श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी नेत्या मेहबूबा मुफ्ती आणि ओमर अब्दुल्ला यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना अटक करून शासकीय विश्राम गृहात ठेवण्यात येणार आहे. जम्मू-काश्मीरमधील अनुच्छेद ३७० हटविल्यानंतर केंद्र सरकारने ही कारवाई केली आहे.
जम्मू-काश्मीरमधील ३७० कलम हटविण्याचा प्रस्ताव संसदेत ठेवण्याच्या आधी रविवारी रात्री जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती आणि ओमर अब्दुल्ला यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते. आज सकाळी संसदेत अनुच्छेद ३७० रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर राज्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा व सुव्यवस्था ढासळू नये म्हणून या दोन्ही नेत्यांना पोलिसांनी रात्री ८च्या सुमारास अटक केली. पीपल्स कॉन्फरन्सचे नेते सज्जाद लोन आणि इम्रान अन्सारी यांनाही अटक करण्यात आली आहे. या नेत्यांना किती काळ कोठडीत ठेवण्यात येईल? याबाबतची कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
रविवारी जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांच्या श्रीनगर येथील निवासस्थानी ऑल पार्टी मिटींग झाली होती. या बैठकीला मेहबूबा मुफ्ती, सज्जाद लोन आणि काँग्रेस नेतेही उपस्थित होते. त्यात सरकारने ३७० कलम हटविल्यास करावयाच्या आंदोलनाची रणनीती ठरविल्याचं सूत्रांनी सांगितलं.