वाघाची माहिती तात्काळ देता यावी यासाठी वनविभागाने टोल-फ्री क्रमांक कार्यान्वित करावा -पालकमंत्री विजय वडेट्टीवार

वाघाची माहिती तात्काळ देता यावी यासाठी वनविभागाने टोल-फ्री क्रमांक कार्यान्वित करावा -पालकमंत्री विजय वडेट्टीवार
- Advertisement -

चंद्रपूर, दि. 21 : जिल्ह्यात मागील आठ महिन्यात आठ लोकांचा वाघांच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनांवर आळा घालण्यासाठी वन विभागाने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. संबंधित सर्व विभागांनी त्यांच्या क्षेत्रातील पाच किलोमीटर परिसरातील झुडपांची स्वच्छता करावी. तसेच ज्या ठिकाणी वाघ दृष्टीस पडेल त्या ठिकाणची माहिती तात्काळ देता यावी, यासाठी वनविभागाने टोल फ्री क्रमांक कार्यान्वित करण्याचे निर्देश आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी वनविभागाला दिलेत.

हिराई विश्रामगृह, ऊर्जानगर येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, मनपा आयुक्त विपिन पालीवाल, औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता पंकज सपाटे, अधीक्षक अभियंता सुहास जाधव, मुख्य वनसंरक्षक एन.आर. प्रवीण, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक जितेंद्र रामगावकर, वन अकादमीचे अपर संचालक प्रशांत खाडे, वेकोलिचे प्रबंधक मोहम्मद साबिर, इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोत्रे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

संबंधित विभागांनी त्यांच्या क्षेत्रातील पाच किलोमीटर परिसरातील काटेरी झुडपांची स्वच्छता करावी.असे सांगून पालकमंत्री श्री. वडेट्टीवार म्हणाले, ऊर्जानगर प्लांट परिसरात मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपे व गवत वाढलेली आहेत. त्यामुळे वन्यप्राण्यांना याठिकाणी वास्तव्य मिळते. यासाठी ऊर्जानिर्मितीने त्यांच्या परिसरातील नालेसफाई, काटेरी झाडे व झुडपांची स्वच्छता करावी. यासोबतच डब्ल्यूसीएल, वनविभाग, सीएसटीपीएस या विभागांनी त्यांच्या पाच किलोमीटर परिसरातील झुडपांची स्वच्छता करावी. जेणेकरून वन्यप्राण्यांना वास्तव्य मिळणार नाही व त्यांचा त्या परिसरातील वावर थांबेल. व हल्ल्याच्या घटना काही प्रमाणात कमी होतील.

ऊर्जानिर्मितीने कॉलनी तसेच प्लांट परिसरातील संरक्षक भिंतीचे काम तातडीने पूर्ण करावेत. सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा, ज्या ठिकाणी संरक्षक भिंत नाही, त्या संरक्षक भिंतीचे काम करून घ्यावे, काही ठिकाणी फेंसिंग तुटलेली आहे त्या फेंसिंगचे काम करून घ्यावे. घटना घडल्यानंतर सदर कामे हाती न घेता अशा प्रकारची महत्त्वाची कामे आधीच पूर्ण करून घ्यावीत. असेही ते म्हणाले.

पालकमंत्री विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले, वाघाचे हल्ले थांबविण्यासाठी ऊर्जानिर्मिती व वनविभागाने समन्वयाने कार्य करावे. वाघाचा येण्याचा मार्ग, कॅारीडोर ब्रेक करावेत, या परिसरात ऊर्जानिर्मिती व वनविभागाने सेक्युरिटी टीम नेमावी. वनविभागाने ग्रामीण भागात गस्त वाढवावी. वाघाला ट्रॅप करण्यासाठी ट्रॅप कॅमेरे लावावेत. एक्शन प्लॅन ठरला असून त्यानुसार वनविभागांने कामे करावीत. पुढे अशा प्रकारच्या घटना घडता कामा नये, याची दक्षता संबंधित विभागाने घ्यावी. दिलेल्या सूचनांनुसार स्वच्छता मोहीम युद्धपातळीवर करावी व आवश्यक त्या उपाययोजना तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी या बैठकीत संबधित अधिकाऱ्यांना दिले.

- Advertisement -