श्रीरामपूरमध्ये पुरस्थिती : गोदावरी नदीकाठच्या लोकांना सुरक्षितस्थळी हलविले

- Advertisement -

श्रीरामपूर : नांदूर मधमेश्वर येथून गोदावरी नदीला दोन लाख क्यूसेकने पाणी सोडण्यात आल्याने गोदावरी नदीला पुरस्थिती निर्माण झाली आहे. श्रीरामपूर तालुक्यातील नदीकाठच्या गावातील सुमारे 50 लोकांना प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलवले आहे.
प्रांताधिकारी तेजस चव्हाण, तहसीलदार प्रशांत पाटील, तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक मसूद खान, नायब तहसीलदार जयश्री गुंजाळ यांच्यासह नेवासे पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले आहे. परिस्थिती अद्याप नियंत्रणाखाली असली तरी दक्ष असल्याचे प्रशासनाने सांगितले. तालुक्यातील गोदावरी नदीकाठी कमालपूर, खानापूर, सराला येथून 45 लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. आपत्कालीन यंत्रणेच्या बोटीही सज्ज असल्याचे गुंजाळ यांनी सांगितले. कमालपूर येथील महानुभाव आश्रम येथील सर्व भाविक सुरक्षित बाहेर काढले आहे.
दरम्यान, सन 2006 मध्ये गोदावरी नदीला अडीच लाख क्यूसेकने पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी कमालपूर व सरला बेटावर पाणी घुसले होते. सर्व गावक-यांना घरे सोडावी लागली होती. आता गोदावरी नदी दोन लाख क्युसेकने वाहती झाली असली तरी परिस्थिती नियंत्रणात आहे.

- Advertisement -