अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
- Advertisement -

अहमदनगर, दि. 31 मे (जि.मा.का.वृत्तसेवा) :- पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी उत्तम राज्य कारभाराचा आदर्श घालून दिला आहे. त्यांनी भारताला प्रशासकीय संरचनेची मोठी देणगी दिली आहे. अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यादेवी होळकर यांचे  नाव देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली. त्यांच्या नावामुळे जिल्ह्याचा मान मोठा होणार असल्याचेही ते म्हणाले.

चौंडी, ता.जामखेड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 298 व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.

व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सदाशिवराव लोखंडे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार प्रा.राम शिंदे, आमदार मोनिका राजळे, आमदार बबनराव पाचपुते, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सुरेश धस, माजी खासदार विकास महात्मे, माजी आमदार भीमराव धोंडे, अण्णासाहेब डांगे, बाळासाहेब मुरकुटे, लक्ष्मणराव ढोबळे, पोपटराव गावडे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनित झालेले आपले राज्य असून या भूमीचा वसा आणि वारसा वाहणाऱ्यांची मोठी मांदियाळी आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे काम आणि कर्तृत्व खूप मोठे होते. सर्वसामान्यांसाठी त्यांनी केलेला त्याग सर्वश्रुत आहे. त्या काळात जमीन महसूल, शेतसारा, चलन व्यवस्था, डाकसेवा यासारख्या व्यवस्था त्यांनी उभारल्या. शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्या हितासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. त्यांनी जन्म घेतलेल्या या मातीचे आपल्यावर खूप मोठे ऋण असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

सर्वसामान्यांना न्याय देणारे हे सरकार असल्याचे सांगत मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, सर्वसामान्यांच्या हितासाठी शासनाने विविध निर्णय घेतले आहेत. केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य शासनाने “नमो शेतकरी सन्मान योजना” सुरू केली असून केंद्र सरकारचे सहा हजार व राज्य शासनाचे सहा हजार असे 12 हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी तत्वावरील महामंडळासाठी 10 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

अहिल्यादेवी होळकरांनी न्यायप्रिय शासन व्यवस्था निर्माण केली – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची ज्योत पेटवली. आपला आत्मभिमान, आत्मविश्वास व आत्मसन्मान जागृत करून हिंदवी स्वराज वाढवले. पुण्यश्लोक अहिल्यादेवीनी आपल्या कार्याच्या माध्यमातून हिंदवी स्वराज्याचा विस्तार संपूर्ण देशभर केला. न्यायप्रिय शासन व्यवस्था उभारून सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याचे काम केले. अहिल्यादेवी होळकर यांचे राज्य परिवर्तनवादी व पुरोगामी होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी त्या काळात न्यायप्रिय शासन व्यवस्था निर्माण केली.त्यांनी राज्यात पायाभूत सुविधा निर्माण करण्याबरोबरच हुंडाबंदी, मद्यबंदी बाबत जागृतीचे काम केले. देशभरातील विविध मंदिरांचा जीर्णोद्धार त्यांनी केला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

राज्य शासनाने मेंढपाळांसाठी कर्ज योजना मंजूर करत त्यांच्यासाठी  पावसाळ्यात चराई रान राखून ठेवण्याचा निर्णय घेतला.राज्यातील धनगर वाड्यांना मुख्य रस्त्यांशी जोडण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली. धनगर समाजातील व्यक्तींसाठी दरवर्षी 25 हजार घरे बांधण्याचा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी पालकमंत्री श्री. विखे पाटील, आमदार श्री. पडळकर यांचीही समयोचित भाषण झाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार प्रा. शिंदे यांनी केले.

यावेळी अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमधील पुरस्कार विजेत्या महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

सर्वप्रथम मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच मान्यवरांनी परिसरात उभारण्यात आलेल्या शिल्पसृष्टीची पाहणीही केली.

- Advertisement -