पुण्यातील बिबवेवाडी भागात घरगुती कारणावरून आत्महत्या करण्याच्या तयारीत असलेल्या तरुणाचे प्राण पोलिसांनी वाचवले. गुरुवारी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास कमलेश गद्रे (वय 41, राहणार B-27 लोअर इंदिरानगर, बिबवेवाडी, पुणे) हा तरुण आत्महत्या करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ज्यानंतर पोलिसांनी तातडीने या ठिकाणी धाव घेत घराचा दरवाजा तोडला आणि त्या तरुणाचे प्राण वाचवले.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की,गुरुवार दिनांक 29 ऑगस्ट 2019 रोजी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास एक महिला बिबवेवाडी पोलीस ठाण्यात धावत आली आणि माझा मुलगा आत्महत्या करतो आहे, त्याला वाचवा असे सांगितले. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक प्रकाश वाघमारे, बीट मार्शल पोलीस शिपाई निलेश मतकर, धुमाळ, पोलीस नाईक शशी भोसले, महिला पोलीस शिपाई खूटवड यांनी बिबवेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांच्या मार्गदर्शनानुसार व सूचनेप्रमाणे तातडीने धावघेत अग्निशामक दलाला माहिती देत अग्निशामक दलाच्या जवानांच्या सहाय्याने घराचा दरवाजा तोडून कात्रीने आत्महत्या करण्याच्या तयारीत असलेल्या तरुणाला पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता त्याच्या हातातील कात्री हिसकावून घेत त्याला समुपदेशन करून आत्महत्येपासून परावृत्त केले. त्यामुळे या तरुणाच्या आईने पोलिसांचे आभार मानले आहेत. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस पुढील तपास करत आहेत.