उपमुख्यमंत्री अजित पवार आणि झिशान सिद्दीकी यांच्या उपस्थितीत बैठक
१८ वर्षांपासून घरांचा प्रश्न प्रलंबित; शासनाकडे प्रस्ताव देण्याची रहिवाशांना सूचना
मुंबई, दि. ७ : मुंबईतील वांद्रे पूर्वच्या गोळीबार रोडवरील शिवालिक ट्रॅन्झिट कॅम्पमध्ये २६ फेब्रुवारी रोजी लागलेल्या आगीत नुकसान झालेल्या रहिवाशांचे त्याच ठिकाणी सुरक्षित घरांमध्ये तात्पुरते पूनर्वसन करण्यात यावे. वर्षभरात तेथेच नवीन ट्रान्झिट कॅम्प तयार करुन रहिवाशांच्या निवासाची सोय करावी. शिवालिक विकसकाने गेल्या १८ वर्षांत प्रकल्प पूर्ण न केल्याने त्याच्याऐवजी अन्य नामांकित विकसकांकडून हा प्रकल्प पूर्ण करुन रहिवाशांना न्याय मिळवून द्यावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले.
स्थानिक आमदार झिशान बाबा सिद्दीकी यांच्या मागणीवरुन मंत्रालयात आज विशेष बैठक झाली. बैठकीला वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता, गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंह, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे आदींसह संबंधित अधिकारी आणि शिवालिक ट्रान्झिट कॅम्प रहिवाशी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी बैठकीत, हा प्रकल्प पूर्ण होण्यास झालेला विलंब, प्रकल्पाच्या अंमलबजावणीत येत असलेल्या अडचणी, ट्रॅन्झिट कॅम्प रहिवाशांच्या समस्या, तेथील महिला, विद्यार्थी वर्गाच्या मागण्यांचा आढावा घेतला. त्यानंतर मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, शिवालिक विकसकाकडून प्रकल्प पूर्ण होण्यास झालेला विलंब अक्षम्य, रहिवाशांवर अन्याय करणारा आहे. हा प्रकल्प मार्गी लागण्यासाठी संबंधित रहिवाशी आणि गृहनिर्माण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहमतीने अन्य चांगला विकसक शोधण्याच्या पर्यायाचा विचार करावा. त्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करुन मान्यता घेण्यात यावी. 26 फेब्रुवारी रोजी लागलेल्या आगीत नुकसान झालेल्या कुटुंबातील विद्यार्थी स्थानिक शाळा-महाविद्यालयांमध्ये शिकतात. महिला स्थानिक ठिकाणी घरकाम करतात. त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी रहिवाशांचे त्याच ठिकाणी उपलब्ध ट्रॅन्झिट कॅम्पमध्ये तात्पुरते पुनर्वसन करण्यात यावे, असे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले.
०००