नाशिक, दिनांक : 10 मार्च, 2024 (जि. मा. का. वृत्तसेवा): केंद्र सरकारच्या जनजातीय विकास विभाग, भारतीय जनजातीय सहकारी विपणन संघ तसेच राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभाग, शबरी आदिवासी विकास महामंडळ यांच्या माध्यमातून आदिवासी बांधवांच्या विकासासाठी व त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध योजना राबविण्यात येत आहेत. आदिवासी बांधवांनी जागरूक राहून त्या योजनांचा लाभ करून घ्यावा. तसेच आदिवासी संस्कृती, कला व पारंपरिक नृत्यांचा वारसा पुढे सुरू राहण्यासाठी त्याची तालुका व जिल्हा पातळीवर नोंदणी होणे आवश्यक असल्याने त्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत, अशा सूचना केंद्रीय आरोग्य, कुटुंब कल्याण तथा जनजातीय विकास राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी आज दिल्या.
आदिवासी विकास विभाग, नाशिक, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्या., नाशिक व भारतीय जनजातीय सहकारी विपणन संघ मर्या. (TRIFED) यांच्या संयुक्त विद्यमाने महाकवी कालिदास कलामंदिर येथे आयोजित आदिवासी कारागीर मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका लीना बनसोड, आदिवासी विकास विभागाचे अतिरीक्त आयुक्त तुषार माळी यांच्यासह भारतीय जनजातीय सहकारी विपणन संघाचे प्रादेशिक व्यवस्थापक शिव चलवादी, ट्रायफेडचे पदाधिकारी व आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार म्हणाल्या, आदिवासी स्वातंत्र्य सैनिक भगवान बिरसा मुंडा यांची जयंती हा जनजातीय गौरव दिवस म्हणून ओळखला जातो. या दिनाचे औचित्य साधून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदिवासी बांधवांच्या सामाजिक-आर्थिक सक्षमीकरणासाठी पीएम जन मन (पीएम जन जातीय) ही योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत वनधन विकास केंद्राच्या लाभार्थ्यांना आत्तापर्यंत साधारण ९१ लाख रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत. तसेच ट्रायफेड संबंधित महाराष्ट्रातील २४ आदिवासी कारागिरांना कार्यक्रमात GI प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. वनधन विकास, एमएसपी, एफपीओ अशा आदिवासी बांधवांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणाऱ्या योजना राबविल्या जात आहेत. या योजनांच्या लाभातून आदिवासी महिला बचत गट, वनधन विकास केंद्र यांच्या माध्यमातून आत्मविश्वासाने उद्योग क्षेत्राकडे वळत आहेत. निसर्गाकडून मिळणाऱ्या शेतमाल तसेच अन्य साधनसामुग्रीला उत्पन्नाचे स्त्रोत बनवून स्वत: सोबतच इतर महिलांची आर्थिक उन्नती साधतांना दिसत आहेत. याचप्रमाणे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या शिष्यवृत्ती योजना, एकलव्य स्कूल, आदिवासी आश्रम शाळा, शैक्षणिक प्रगतीच्या योजनांच्या बाबतीत देखील जागरूक राहणे आवश्यक आहे, असे ही केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार यांनी यावेळी सांगितले.
तसेच, आदिवासी बांधवांची कला, संस्कृती, पारंपरिक नृत्यांची परंपरा सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्ह्यातील प्रकल्प अधिकारी यांनी तालुका व जिल्हा पातळीवर या नृत्य समुहांची नोंदणी करावी. जेणे करून राज्य तसेच देश पातळीवर आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्याचे संधी त्यांना उपलब्ध होईल, असे डॉ. पवार यांनी सांगितले.
लीना बनसोड म्हणाल्या, आदिवासी बांधव त्यांच्या नृत्यशैलीतून नवचैतन्य निर्माण करत असतात. त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शबरी आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्या योजनांची थोडक्यात माहिती देवून या योजनांचा आदिवासी बांधवांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही लीना बनसोड यांनी यावेळी केले.
प्रारंभी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. तसेच आदिवासी बांधवांनी तयार केलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनाला डॉ. भारती पवार यांनी भेट दिली. त्याचप्रमाणे आदिवासी बांधवांनी वरूण राजाला पावसासाठी आवाहन करणारे आदिवासी नृत्य, नागपंचमीच्या काळात करण्यात येणारे तारपा नृत्य, होळी सणात सादर करण्यात येणारे आदिवासी डांगी नृत्य अशा विविध आदिवासी पारंपरिक नृत्यांचे सादरीकरण करण्यात आले. यानंतर आदिवासी विकास विभाग, भारतीय जनजातीय सहकारी विपणन संघ यांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या माहिती देणाऱ्या ध्वनीचित्रफिती दाखविण्यात आल्या.
राष्ट्रीय अनुसूचित जमाती वित्त व विकास महामंडळाच्या सहकार्याने शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ यांच्या अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजना लाभार्थ्यांना धनादेश वाटप खालीलप्रमाणे
- विमल राजेंद्र बोके – रु. 2,00,000/-
- तीलोत्तमा चंद्रकांत नाठे- रु. 3,00,000/-
- प्रतिभा मुकुंदा भोये- रु. 2,00,000/-
- जनार्दन बाळू हलकंदर- रु. 10,00,000/-
या वनधन केंद्राना धनादेशाचे झाले वाटप….
1) जय कातकरी वन धन विकास केंद्र, हरसूल, ता. त्र्यंबकेश्वर- रु. 3,30,000/-
2) वन धन विकास केंद्र, रामवाडी, नांदगाव- रु.1,65,000 /-
3) वन धन विकास केंद्र, करंजखेड – रु. 1,25,000/-
4) वन धन विकास केंद्र, कोसवन, कळवण – रु.14,92,500/-
5) दिशा वन धन विकास केंद्र, कळवण’ – रु.14,92,500/-
6) कल्पतरू वन धन विकास केंद्र, मोहदान, पेठ – रु.7,50,000/-
7) प्रतीक्षा वन धन विकास केंद्र, अभोणा, कळवण रु. 14,92,500/-
00000000