उरण: जेएनपीटी परिसरातील दररोज होणारी वाहतूक कोंडी विरोधात उरणधील युवांतर्फे 9 ऑक्टोंबर रोजी जन-आक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे.
उरण ते नवी मुंबई, उरण ते पनवेल या 40 ते 50 मिनिटांच्या प्रवासाला 4 ते 5 तास लागतात. इथल्या जेएनपीटी पोर्टची अवजड वाहतूक, रस्त्यावरची बेकायदेशीर पार्किंग आणि रस्त्यांची दयनीय अवस्था या समस्येने तीव्र रूप धारण केले आहे. त्याचा त्रास आबालवृद्धांसह उरणमधील महिला, अपंग, शाळा, कॉलेजमधील विद्यार्थी, नोकरीसाठी जाणारा कर्मचारी वर्ग तसेच बाजार खरेदी विक्रीसाठी जाणाऱ्या व्यावसायिक वर्गाला खूप मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे.
काही बेकायदेशीर कट, मार्ग बंद केले आणि बेकायदेशीर पार्किंगवर अंकुश ठेवण्याचे काम सुरू झाले असले तरी अधिसूचना काढणे महत्वाचे आहे. त्यात चालढकल होत आहे. उरणकरांच्या रहदारीची वेळ सकाळी 7 ते 11 आणि सायं. 5 ते 9 आहे. या वेळेत उरण मधील सर्व नागरिक खूप मोठ्या प्रमाणात प्रवास करीत असतात. त्यामुळे अवजड वाहतूक करळफाटा ते उरणफाटा या रस्त्यावर बंद करावी आणि तशी आधिसूचना पोलीस खात्याने तसेच जेएनपीटी प्रशासनाने काढावी ही प्रमुख मागणी या तरुणांची आहे.
परंतु जेएनपीटी प्रशासन व पोलीस खाते अधिसूचना काढण्यास चालढकल करत आहेत.त्यामुळे हा प्रश्न सुटत नसल्याने युवा उरण व ट्रॅफिकमुक्त उरण ग्रुपने बुधवारी 9 ऑक्टोबर रोजी करळ फाटा येथे सकाळी 8 वाजल्यापासून लोकशाही मार्गाने जनआक्रोश आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये सुमारे तीन हजार युवा सहभागी होणार आहेत. या आंदोलनात कोणत्याही राजकीय नेत्याची वाहवा किंवा टीका न करता हा लढा उरणमधील सर्व तरुणांनी एकत्र येत प्रशासनाविरोधात उभारला आहे. या आंदोलनात जनता, राजकीय पक्षांनी आपला पक्ष, झेंडे, पद बाजूला ठेवत सामान्य उरणकर म्हणून सामील होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उरणच्या तरुणांनी व्हाट्स अॅप ग्रुप, फेसबुक आदी सोशल मीडियाद्वारे एकत्र येत जनजागृती सुरुवात केली आहे.