मुंबई-गोवा महामार्गावर १६ टनांवरील अवजड वाहनांना गणेशोत्सव काळात निर्बंध – महासंवाद

    - Advertisement -

    मुंबई, दि. १० : गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची वाहतूक सुरळीत व्हावी आणि मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 वरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी 16 टन किंवा त्यापेक्षा अधिक वजनक्षमता असलेल्या जड-अवजड वाहनांच्या वाहतुकीवर विविध टप्प्यांत निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

    गणेशोत्सवपूर्व तयारी व मूर्तींच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर 11 सप्टेंबर 2026 रोजी मध्यरात्री 00.01 पासून 15 सप्टेंबर रोजी रात्री 11 पर्यंत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 वर 16 टन किंवा त्यापेक्षा अधिक वजनक्षमता असलेल्या ट्रक, मल्टीॲक्सल, ट्रेलर, लॉरी आदी जड-अवजड वाहनांच्या वाहतुकीस पूर्णतः बंदी राहणार आहे.

    तसेच पाच दिवसांच्या गणपती विसर्जन व परतीच्या प्रवासासाठी 18 सप्टेंबर रोजी सकाळी 8 ते रात्री 11 पर्यंत, सात दिवसांच्या गणपती तसेच गौरी-गणपती विसर्जन व परतीच्या प्रवासासाठी 19 सप्टेंबर रोजी सकाळी 8 ते 20 सप्टेंबर रोजी रात्री 11 पर्यंत निर्बंध लागू राहतील. अनंत चतुर्दशीच्या 12 दिवसांच्या गणपती विसर्जन व परतीच्या प्रवासासाठी 25 सप्टेंबर रोजी सकाळी 8 ते 26 सप्टेंबर रोजी रात्री 8 पर्यंत अवजड वाहनांची वाहतूक बंद राहणार आहे. नोंदणीकृत वाहनांची वजनक्षमता ठरविताना मालासह वाहनाचे एकूण वजन अर्थात टोटल ग्रॉस व्हेईकल वेट ग्राह्य धरले जाणार आहे.

    निर्बंधातून जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवांची वाहने वगळली

    या निर्बंधातून जेएनपीटी व जयगड बंदरातून आयात-निर्यात मालाची वाहतूक करणारी वाहने, तसेच दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, औषधे, लिक्विड मेडिकल ऑक्सिजन, अन्नधान्य, भाजीपाला व अन्य नाशवंत व जीवनावश्यक वस्तू वाहून नेणारी वाहने वगळण्यात आली आहेत. पोलीस, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, आपत्ती व्यवस्थापन तसेच अन्य अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांनाही हे निर्बंध लागू राहणार नाहीत.

    मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 वरील रुंदीकरण व दुरुस्तीच्या कामासाठी तसेच संबंधित साहित्य व मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांनाही निर्बंधातून वगळण्यात आले आहे. अशा वाहनांना संबंधित वाहतूक विभाग किंवा महामार्ग पोलिसांकडून प्रवेशपत्र देण्यात येणार आहे.

    कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची सुरक्षित व सुरळीत वाहतूक आणि महामार्गावरील परिस्थिती लक्षात घेऊन नवी मुंबईचे पोलीस आयुक्त तसेच संबंधित जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक परिस्थितीनुसार जड-अवजड वाहनांवरील निर्बंध शिथील करण्याबाबत योग्य निर्णय घेऊ शकतील. तसेच जेएनपीटी व जयगड बंदरातून होणारी आयात-निर्यात मालाची वाहतूक सुरळीत राहण्यासाठी आवश्यक वाहतूक नियोजन करण्याचे निर्देश परिवहन विभागाचे उपसचिव चेतन निकम यांनी दिले आहेत.

    ००००

    संजय ओरके/विसंअ

     

     

    - Advertisement -