
नंदुरबार, दि.१० सप्टेंबर: जिल्हा क्रीडा संकुलासाठी शासनाकडून प्राप्त 15 कोटी रुपयांच्या निधीतून विविध क्रीडा सुविधा निर्माण करण्याचे काम सुरू असून, या अंतर्गत पूर्ण झालेल्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन राज्याचे वैद्यकीय शिक्षण तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातून दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आले. जिल्ह्यातील खेळाडूंना आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी सूचना पालकमंत्री मुश्रीफ यांनी यावेळी केली.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, पोलिस अधीक्षक अश्विनी सानप, अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी आदी उपस्थित होते.

या इमारतीमुळे क्रीडा संकुलातील प्रशासकीय कामकाजासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत. प्रशासकीय इमारतीमध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बैठक सभागृह तसेच बहुउद्देशीय सभागृहाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. क्रीडा संकुलात खेळाडूंसाठी तळमजला व तीन मजल्यांचे वसतिगृह उभारण्याचे काम सुरू आहे. या वसतिगृहामध्ये एकूण 200 खेळाडूंच्या निवासाची व्यवस्था उपलब्ध होणार आहे.
याशिवाय क्रीडा संकुलातील जुन्या वास्तूंच्या दुरुस्तीचे कामही या निधीतून करण्यात येत आहे. सन 2005-2006 मध्ये बांधण्यात आलेल्या बॅडमिंटन हॉलची, सन 2008-2009 मध्ये बांधण्यात आलेल्या जुन्या वसतिगृहाची तसेच सन 2015-2016 मध्ये बांधण्यात आलेल्या शूटिंग रेंजची दुरुस्ती पूर्ण करण्यात आली आहे. क्रीडा संकुलातील मातीच्या ट्रॅकच्या दुरुस्तीचे कामही हाती घेण्यात येत आहे.
या विविध पायाभूत सुविधांमुळे जिल्ह्यातील खेळाडूंना सराव, प्रशिक्षण, निवास तसेच क्रीडा क्षेत्राशी संबंधित प्रशासकीय कामकाजासाठी अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी महेश पाटील यांनी दिली.
००००

WhatsApp